'या' दिवशी होणार पोलीस भरतीची लेखी परीक्षा; ...आतापासून तयारीची लागा!
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी झाली आहे. अशा उमेदवारांची पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा येत्या 7 जुलै रोजी घेतली जाणार आहे. तर पोलीस भरतीची चालक पदाची लेखी परीक्षा ही येत्या 14 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. याबाबत अपर पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षेतेखालील झालेल्या बैठकीत माहिती समोर आली आहे. त्यानुसार तयारी करण्याचा सूचना अपर पोलीस महासंचालक यांनी पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधिक्षकांना दिल्या आहेत.
गृह विभागाची लेखी परीक्षेसाठी तयारी सुरु
महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीची घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. मात्र, आचारसंहिता लागू असल्याने तब्बल चार महिने पोलिस भरती प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे आता आचारसंहिता संपताच पोलीस भरती प्रक्रियेला वेग आला आहे. परिणामी, आता मैदानी चाचणी संपताच विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्याची तयारी गृह विभागाने सुरु केली आहे.
१:१० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार
लेखी परीक्षेच्या दृष्टीकोनातून पुर्व तयारी, सुचना व निर्देश देण्याकरता आज अपर पोलीस महासंचालक यांच्याकडून बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बैठकीत लेखी परीक्षेच्या संदर्भातील मुद्दे समोर ठेवण्यात आले. मैदानी चाचणी संपली की लगेच काही दिवसांत लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. दरम्यान, मैदानी चाचणी 50 गुणांची झालेली आहे. आता लेखी परीक्षा 100 गुणांची होणार आहे. प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे.
लेखी परीक्षेला बसण्यासाठी मैदानी चाचणीत किमान 40 टक्के गुण मिळवणे उमेदवाराला बंधनकारक असणार आहे. पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने, ग्रामीण भागातील तरूणांना याचा मोठा फायदा होणार आहे. मात्र, लेखी परीक्षेसाठी त्यांना चांगलेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे आतापासून तयारी लागणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
भरतीसाठी किती अर्ज आलेत?
दरम्यान, राज्यातील पोलिस भरतीसाठी 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. राज्यातील 9 हजार 595 पोलीस शिपाई पदाच्या जागांसाठी 8 लाख 22 हजार 984 अर्ज गृह विभागाकडे आले आहेत. चालक पदासाठीच्या 1686 जागांसाठी 1 लाख 98 हजार 300 अर्ज आले आहेत. तर तुरूंग विभागातील शिपाई या पदासाठी 1800 जागा उपलब्ध असून यासाठी 3 लाख 72 हजार 354 अर्ज आले आहेत. याशिवाय पोलीस विभागातील बँड्समन पदासाठी 41 जागा उपलब्ध असून, त्यासाठी 32 हजार 26 जणांनी अर्ज गृहविभागाला प्राप्त आहेत.