फोटो सौजन्य - Social Media
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अडथळे येतात, पण काही लोक त्या अडथळ्यांना संधीमध्ये रूपांतरित करतात. अशाच एका जिद्दी आणि प्रेरणादायी प्रवासाची कहाणी आहे. प्रांजळ पाटील यांची, ज्यांनी दृष्टिहीन असूनही दोनदा UPSC परीक्षा उत्तीर्ण करत देशातील पहिल्या अंध IAS अधिकारी होण्याचा मान मिळवला.
प्रांजळ यांचा जन्म महाराष्ट्रातील उल्हासनगर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांची दृष्टी कमकुवत होती आणि केवळ सहा वर्षांच्या वयात त्यांनी पूर्णपणे दृष्टी गमावली. मात्र ही अपंगता त्यांच्या आत्मविश्वासावर कधीही परिणाम करू शकली नाही. त्यांनी ही परिस्थिती स्विकारली नाही, तर तिचा सामना करत आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा सुरू ठेवला. मुंबईतील कमला मेहता दादर स्कूल फॉर द ब्लाइंड येथून प्रांजळ यांनी शालेय शिक्षण घेतले. पुढे त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध विषयात एम.ए., एम.फिल. आणि पीएचडी पदवी मिळवली. शिक्षणात त्यांना अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी कधीही हार मानली नाही.
UPSC परीक्षेसाठी बहुतांश विद्यार्थी कोचिंग क्लासेसला प्राधान्य देतात, पण प्रांजळने कोणताही क्लास न लावता, केवळ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अभ्यास केला. त्यांनी खास सॉफ्टवेअरच्या मदतीने पुस्तकं ऐकून वाचन केलं आणि अभ्यास पूर्ण केला. प्रांजळने पहिल्यांदा 2016 मध्ये UPSC परीक्षा दिली आणि 744वी रँक मिळवली. पण ती रँक त्यांच्या समाधानासाठी पुरेशी नव्हती. त्यांनी पुढील वर्षी म्हणजेच 2017 मध्ये पुन्हा प्रयत्न केला आणि यावेळी 124वी रँक मिळवत IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
2018 मध्ये प्रांजळ पाटील यांची नेमणूक केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात असिस्टंट कलेक्टर म्हणून झाली. ही नेमणूक त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी एक अभिमानाचा आणि प्रेरणादायक क्षण ठरला. प्रांजळ यांची कहाणी हे सिद्ध करते की अपंगत्व किंवा कोणतीही मर्यादा तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही, जर तुमच्याकडे आत्मविश्वास, चिकाटी आणि ध्येय गाठण्याची तळमळ असेल.