फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NMDC) लिमिटेड या इस्पात मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारत सरकारच्या नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती अधिसूचना क्र. 03/2025 दिनांक 22 मे 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, छत्तीसगडमधील किरंदुल, बचेली आणि कर्नाटकमधील दोणिमलाई येथील विविध युनिट्ससाठी ही भरती होणार आहे. खाणकाम व इस्पात उद्योगात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. तसेच कामाच्या शोधात असणाऱ्या आणि कामासाठी राज्यभाहेर जाऊन काम करण्याची तयारी असणाऱ्या लोकांसाठी ही उत्तम संधी आहे.
या भरतीत एकूण 683 पेक्षा अधिक रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. फील्ड अटेंडंट, मेंटेनन्स असिस्टंट, एचईएम ऑपरेटर, ब्लास्टर आणि इतर विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांना 25 मे 2025 ते 14 जून 2025 या कालावधीत अधिकृत संकेतस्थळ www.nmdc.co.in च्या “Careers” विभागात जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल. या भरतीसाठी पात्रतेसाठी वयोमर्यादा 14 जून 2025 रोजी किमान 18 वर्षे व कमाल 30 वर्षे इतकी आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी (नॉन क्रीमी लेयर) उमेदवारांना 3 वर्षे व अपंग, माजी सैनिक, तसेच खात्यातील कर्मचारी यांना शासन नियमांनुसार वय सवलत दिली जाणार आहे.
निवडप्रक्रिया दोन टप्प्यात पार पडणार आहे. प्रथम टप्पा म्हणजे 100 गुणांची OMR/कंप्युटर आधारित चाचणी (CBT) होईल. दुसऱ्या टप्प्यात शारीरिक क्षमता चाचणी किंवा ट्रेड टेस्ट असेल, जे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवले जाईल. दुसरा टप्पा केवळ पात्रता तपासण्यासाठी असेल.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शुल्क देखील ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट भविष्यातील उपयोगासाठी सुरक्षित ठेवावी. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी ही संधी गमावू नये. NMDC ही देशातील एक प्रतिष्ठित संस्था असून, येथे नोकरी मिळाल्यास सुरक्षित भविष्यासह करिअरमध्ये स्थैर्य मिळू शकते.