फोटो सौजन्य - Social Media
यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) द्वारे घेतली जाणारी सिव्हिल सेवा परीक्षा ही देशातील सर्वांत कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक मानली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते: प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत (इंटरव्ह्यू). या तिन्ही टप्प्यांमध्ये यश मिळवणारे उमेदवारच पुढे जाऊन आयएएस, आयपीएस, आयएफएस अधिकारी बनतात. जरी ही परीक्षा कठीण असली, तरी अनेक उमेदवार प्रथम प्रयत्नातही यश मिळवतात. याच यशाचे जिवंत उदाहरण आहे प्रिया राणी, ज्या दोन वेळा UPSC परीक्षा दिली आणि दोन्ही वेळा यश मिळवले.
प्रिया राणी या मूळच्या बिहार राज्यातील फुलवारी शरीफच्या कुरकुरी गावातील रहिवासी आहेत. त्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांचे वडील शेतकरी असून आई गृहिणी आहेत. आर्थिक परिस्थिती अगदीच साधारण असली तरी पालकांनी त्यांच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही. प्रिया लहानपणापासून अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी बिहारमधूनच प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि पुढे रांची येथे इंजिनीअरिंग करण्यासाठी गेल्या. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये B.Tech पूर्ण केलं. प्रिया राणी यांना बी.टेक पूर्ण केल्यानंतर बंगळुरूमधील एका खासगी कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. मात्र, त्यांच्या मनात नेहमीच काहीतरी “मोठं” करण्याची इच्छा होती. याच विचारातून त्यांनी UPSC सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.
या निर्णयामध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना पूर्ण साथ दिली. प्रिया यांनी त्यांच्याशी वचन दिलं की, “मी एक दिवस नक्कीच आयएएस अधिकारी बनेन.” प्रिया राणी यांनी दिल्लीमध्ये राहून UPSC ची तयारी सुरू केली. त्यांच्या परिश्रमाचा पहिला निकाल 2021 मध्ये लागला. पहिल्याच प्रयत्नात त्यांना 284वी ऑल इंडिया रँक (AIR) मिळाली आणि त्यांची भारतीय संरक्षण संपदा सेवा (IDES)मध्ये निवड झाली.
पण त्यांच्या डोक्यात एकच विचार होता “मी वडिलांना आयएएस बनून दाखवणार.” म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा UPSC परीक्षेला बसायचा निर्णय घेतला. 2023 मध्ये त्यांनी दुसरा प्रयत्न केला आणि या वेळी त्यांना AIR 69 मिळाली आणि थेट IAS सेवा मिळाली. प्रिया राणी यांची ही कथा केवळ यशाची नाही, तर आत्मविश्वास, चिकाटी, आणि वचनपूर्तीची कहाणी आहे. ज्या मुलीने हाय सॅलरीची नोकरी सोडून अभ्यासाला प्राधान्य दिलं, तीच आता देशासाठी सेवा करणार आहे.