फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने २०२५ साठी ‘Right to Education’ (RTE) अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. ही प्रवेश प्रक्रिया मंगळवार, दिनांक १४ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. पालकांना आपल्या मुलांसाठी अर्ज करायचा असल्यास ते अधिकृत संकेतस्थळ student.maharashtra.gov.in वर जाऊन अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे या मुदतीपर्यंत इच्छुक पालकांना त्यांच्या पाल्याचे ऍडमिशन करावे लागणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे.
शिक्षणाच्या अधिकार अधिनियम २००९ च्या कलम १२ (१) (सी) नुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित गटातील मुलांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, अनुदानित नसलेल्या शाळा, पोलीस कल्याण शाळा (अनुदानित नसलेल्या) आणि महापालिकांच्या (स्वयंअर्थसहाय्यित) शाळांमध्ये प्रवेशाचा अधिकार आहे. या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात येणार आहे. अर्ज भरताना उमेदवारांना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत. मुळात, या निकषांच्या आधारे पालकांना त्यांच्या पाल्यासाठी अर्ज करता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात ‘हे’ निकष:
अर्ज करण्यास इच्छुक पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखांहून कमी असणे गरजेचे आहे. २५% आरक्षित जागा असल्याने, या जागांसाठी अर्ज करताना १० शाळांची निवड करावी लागणार आहे. ही निवड अतिशय काळजीपूर्वक करायची आहे. अर्ज करण्याअगोदर पालकांना शाळा आणि घर यामधील अंतर तपासावे लागणार आहे. हे अंतर गूगल मॅपद्वारे निश्चित करावे लागणार आहे. अर्ज दिलेल्या मुदतमध्येच भरण्यात आला पाहिजे. अर्ज भरण्यासाठी अंतिम तारखेची वाट पाहू नका, अंतिम तारखेला तांत्रिक समस्या उदभवनीच्या शक्यता असतात त्यामुळे जितके लवकर होईल तितके लवकर आणि काळजीपूर्वक अर्ज करा. अर्ज करताना योग्य माहिती भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये घराचा पत्ता, जन्मतारीख, उत्पन्नाचा दाखला, अपंगत्व प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इत्यादींचा समावेश होतो.
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आरटीईच्या २५% आरक्षित जागांवर यापूर्वी प्रवेश घेतलेल्या मुलांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. जर एखाद्या मुलाने चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळले, तर तो प्रवेश रद्द केला जाईल. पालकांनी एका वेळेस केवळ एक पूर्ण अर्ज सादर करावा. कोणतेही दस्तऐवज ऑनलाइन अपलोड करू नयेत. पालकांनी वरील सर्व गोष्टींची दक्षता घेत वेळेत अर्ज सादर करावा, जेणेकरून त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ मिळेल.