फोटो सौजन्य - Social Media
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदभरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या राष्ट्रीय स्तरावरील भरती मोहिमेद्वारे देशभरातील विविध सर्कलमध्ये एकूण 2,964 पदे भरण्यात येणार आहेत. हे पद अधिकाऱ्याच्या पातळीवरील असल्याने, बँकिंग क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. अर्ज प्रक्रियेला 21 जून 2025 पासून सुरुवात होणार असून 30 जून 2025 ही अंतिम मुदत आहे. उमेदवार फक्त एका सर्कलसाठी अर्ज करू शकतात आणि त्या सर्कलची स्थानिक भाषा ते वाचता, लिहिता, बोलता आणि समजू शकतात हे आवश्यक आहे.
या भरतीसाठी पात्रता निकषानुसार, उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती-जमातीसाठी 5 वर्षे, इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षे, दिव्यांग उमेदवारांसाठी 10 ते 15 वर्षे व माजी सैनिकांसाठी 5 वर्षे वयामध्ये सवलत आहे. निवड प्रक्रिया चार टप्प्यांत होणार असून यामध्ये ऑनलाइन परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह), अर्ज व कागदपत्र तपासणी (स्क्रीनिंग), मुलाखत आणि स्थानिक भाषेची चाचणी यांचा समावेश आहे. ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये इंग्रजी, रिझनिंग, बँकिंग ज्ञान आणि संगणक यावर आधारित प्रश्न असतील, तर डिस्क्रिप्टिव्ह टेस्टमध्ये इंग्रजी भाषेतील पत्रलेखन आणि निबंध लेखन यांचा समावेश असेल.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी SBI च्या अधिकृत वेबसाइट bank.sbi/web/careers/current-openings या पत्त्यावर जाऊन “Apply Online” वर क्लिक करावे. नोंदणी करताना वैध ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचा फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणापत्र, शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रे तसेच ओळखपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क ऑनलाइन भरून अंतिम सादरीकरण करून त्याची प्रिंटआउट घ्यावी.
SBI CBO भरती 2025 ही अनुभव असलेल्या बँकिंग उमेदवारांसाठी एक उत्तम करिअर संधी असून इच्छुकांनी वेळेत अर्ज करून तयारीला लागणे गरजेचे आहे.