फोटो सौजन्य - Social Media
राज्य शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा सुरू होण्याच्या तारखा निश्चित केल्या आहेत. पुणे विभागातील शाळांसाठी नियमित शैक्षणिक कामकाजाची सुरुवात सोमवार, १६ जून २०२५ पासून होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये वेळापत्रकाबाबत असलेली अनिश्चितता दूर झाली आहे. उन्हाळ्याचा सुट्टीचे दिवस सुरु आहेत आणि लवकरच येत्या महिनाभरात विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागणार आहे. अशामध्ये शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षांची सुरुवात कधी होणार? याची सूचना जाहीर केली आहे. विद्यार्थी तसेच पालकवर्ग त्यानुसार नव्या शैक्षणिक वर्षांची तयारी करू शकतात.
विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी २ मे २०२५ पासून दिली जाणार असून ती १४ जून रोजी संपेल. त्यानंतर दोन दिवसांनी, म्हणजेच १६ जूनपासून नियमित शालेय सत्राला आरंभ होईल. मात्र, विदर्भ विभागासाठी थोडे वेगळे वेळापत्रक आखण्यात आले आहे. तेथील शाळांमध्ये २३ ते २८ जून २०२५ या कालावधीत केवळ सकाळच्या सत्रात शिक्षण घेता येईल. त्यानंतर ३० जूनपासून तेथेही संपूर्ण वेळेचे नियमित वर्ग सुरू होतील.
शिक्षण विभागाच्या नियमानुसार २०२५-२६ या वर्षात किमान २३५ दिवसांचे शैक्षणिक कामकाज असणे आवश्यक आहे. याबाबत सर्व शाळांनी योग्य नियोजन करावे, असा स्पष्ट आदेशही देण्यात आला आहे. हे वेळापत्रक राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांवर लागू होईल. यात शासकीय, जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषद, अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळा यांचा समावेश आहे. स्थानिक परिस्थितीनुसार काही बदल आवश्यक असल्यास, शाळांना स्थानीय शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेऊनच सुट्ट्या देता येतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत २३५ दिवसांपेक्षा कमी कामकाज होऊ नये, याची जबाबदारी शालेय प्रशासनाची असेल.
राज्यभरातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी या नियमानुसार तयारी करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.