फोटो सौजन्य - Social Media
विधानसभेत लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना Vinay Kore यांनी ऐनवाडी परिसरातील शैक्षणिक सुविधांकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, डोंगराळ आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी दूरवर जावे लागते. यामुळे विशेषतः पावसाळ्यात विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना लांब अंतर पायी जावे लागू नये आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही स्थानिक स्तरावर शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे पटसंख्या कमी असली तरी अशा भागांमध्ये जवळच्या ठिकाणी नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेला आवश्यक सूचना देण्यात येतील.
तसेच डोंगरी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण जवळच्या ठिकाणी मिळावे यासाठी सर्व जिल्हा परिषदांमार्फत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय अशा उपक्रमांचा समावेश नवीन समग्र शिक्षण धोरणात करण्याचा विचारही शासन पातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
या निर्णयामुळे ऐनवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून त्यांना शिक्षणासाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






