फोटो सौजन्य - नवराष्ट्र
मुंबई : पुस्तकाने ज्ञान वाढतं, असं म्हटल जात आणि अनेक मोठ्या महाविद्यालयांमध्ये मोठमोठी पुस्तक ग्रथालंय उभारली आहेत. शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या दिशेने प्रेरणादायी पाऊल उचलत चिंगारी शक्ति फाउंडेशन आणि इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे क्वीन्स तिआरा यांच्या संयुक्त प्रयत्नातून जोगेश्वरी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात एक सुसज्ज ग्रंथालय उद्घाटन करण्यात आले. हे ग्रंथालय दिवंगत मयंक जैन यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले असून, त्यांचे प्रथम पुण्यस्मरण म्हणून त्यांच्या पत्नी हेतल जैन आणि परिवारियांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.
या भावनिक क्षणी विद्यालय परिसरात प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले. नवीन ग्रंथालय हे विद्यालयातील एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी अभ्यास, संदर्भ व ज्ञानवृद्धीचे केंद्र ठरणार आहे. येथे विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील पुस्तके, अभ्यास साहित्य आणि शांत व सर्जनशील वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. चिंगारी शक्ति फाउंडेशनच्या संस्थापक पिंकी राजगढिया यांनी सांगितले की, संस्थेचे उद्दिष्ट शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये सबलीकरण घडवणे आहे.
त्यांनी म्हटले,‘आमचा विश्वास आहे की ज्ञान हीच खरी शक्ति आहे — आणि हे ग्रंथालय मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक छोटं पण अर्थपूर्ण पाऊल आहे.’ इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे क्वीन्स तिआराच्या अध्यक्षा गोपिका दोशी यांनी सांगितले की, क्लब नेहमीच सामाजिक विकास, महिला सबलीकरण आणि शैक्षणिक उन्नतीशी निगडित उपक्रमांना सातत्याने पाठिंबा देत राहील, विशेषतः ज्या भागांमध्ये साधनांची कमतरता आहे त्या ठिकाणी.
लक्षात घेण्यासारखे म्हणजे, चिंगारी शक्ति फाउंडेशनने यापूर्वीही विद्यालयात अनेक उल्लेखनीय उपक्रम केले आहेत — जसे की एआय आणि रोबोटिक्स प्रयोगशाळेची स्थापना, २६० शाळा बाकांचे दान, तसेच आगामी टाटा स्वच्छ आरओ प्लांटची उभारणी. विद्यालय प्रशासनाने दोन्ही संस्थांचे मनःपूर्वक आभार मानत सांगितले की हे ग्रंथालय विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढवेल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावेल.






