एबी फॉर्म वादाने धाराशिव शिवसेनेत उघडी फूट; पालकमंत्र्यांसमोर तीन तास गोंधळ, महायुतीच्या जागावाटपावर प्रश्नचिन्ह (फोटो सौजन्य - Gemini)
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या निवासस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी आमदार राजन साळवी हे आले असता, तिथे जमलेल्या शेकडो शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला. तब्बल तीन तास हा गोंधळ सुरू होता. संतप्त शिवसैनिकांनी एकमेकांना शिवीगाळ केली, काही ठिकाणी अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काही जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये शिवसेनेचे अधिकृत एबी फॉर्म भाजप पदाधिकाऱ्यांच्या हाती देण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. या मुद्द्यावरून पक्षातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली. याच पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख राजन साळवी आणि एका स्थानिक शिवसैनिकामधील तीव्र वादाचा संवाद असलेली ऑडिओ क्लिप रविवारी (२५ जानेवारी) सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये जिल्हास्तरीय नेते आणि संपर्कप्रमुखांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
या वादात भूम–परंडा मतदारसंघाचे आमदार व माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांचे नावही घेतले गेले आहे. सावंत यांच्यासारख्या अनुभवी व खंबीर नेत्याच्या हाती पक्षाचे एबी फॉर्म न देता, भाजपाशी जवळीक असलेल्या अजित पिंगळे यांच्यासारख्या नेत्यांच्या हाती फॉर्म देण्यात आल्याने शिवसैनिकांचा संताप अधिकच वाढल्याचे सांगितले जाते. याच असंतोषाचे रूपांतर पालकमंत्र्यांसमोर झालेल्या गोंधळात झाले.
दरम्यान, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पक्षाकडून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. पक्षांतर्गत प्रश्न चुकीच्या पद्धतीने माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर आणणे हे अनुचित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषद गटांच्या २३ आणि पंचायत समिती गणांच्या ५० जागा शिवसेना लढवत असून, मुंबईत झालेल्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीत हे जागावाटप निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या जागांबाबत वाद आहेत, त्या ठिकाणी चर्चा सुरू असून लवकरच तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत उफाळलेला हा वाद महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यकर्त्यांच्या मनातील असंतोष उघडपणे बाहेर आल्याने याचा निवडणूक रणांगणावर नेमका काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






