फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ या कालावधीत इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान, तर इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. दरम्यान, दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत.
यंदा राज्यभरातून दहावीच्या परीक्षेसाठी तब्बल १६ लाख १४ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ३२ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरात एकूण ५११ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून सर्वाधिक विद्यार्थी मुंबई विभागातून परीक्षेला बसणार आहेत. मुंबई विभागातून ३ लाख ४९ हजार ६१२ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. त्याखालोखाल पुणे विभागातून २ लाख ७८ हजार ८०६, नाशिक विभागातून २ लाख ६ हजार ५२८, छत्रपती संभाजीनगर विभागातून १ लाख ९१ हजार ८८५, अमरावती विभागातून १ लाख ६५ हजार ३९८, नागपूर विभागातून १ लाख ५३ हजार ९३७, कोल्हापूर विभागातून १ लाख ३२ हजार ७९७, लातूर विभागातून १ लाख ११ हजार ५५ आणि कोकण विभागातून २५ हजार ७६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरात ४३७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. पुणे विभागातून बारावीच्या परीक्षेसाठी सर्वाधिक २ लाख ६० हजार २६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, इतर विभागांतील नोंदणीची आकडेवारीही लक्षणीय असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. मागील वर्षांप्रमाणे यंदाही परीक्षा पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य मंडळातर्फे ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष पथके, भरारी पथकांची नियुक्ती, केंद्रनिहाय निरीक्षण, तसेच संवेदनशील परीक्षा केंद्रांवर कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे. गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मंडळाकडून देण्यात आला आहे.
परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रावर वेळेआधी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाने सर्व तयारी पूर्ण केल्याचे स्पष्ट केले आहे.






