ठाणे/ स्नेहा जाधव, काकडे : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता ‘आरटीई २५%’ ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत टप्पा क्रमांक ४ मधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पालकांना प्रवेश पूर्ण करण्यास अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी २९ मे पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. मात्र पालकांचा प्रतिसाद लक्षात घेता व काही अपूर्ण प्रवेश प्रक्रियेस संधी देण्यासाठी आता ही मुदत ०९ जून पर्यंत वाढविण्यात आल्याचं सांगितलं आहे.
महत्त्वाची सूचना पालकांसाठी:
• टप्पा क्र. ४ मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक यांनी प्रवेश अद्याप पूर्ण केला नसेल, त्यांनी अलॉटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी.
•ही मुदतवाढ अंतिम असून, दि. ०९ जून नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे सर्व पालकांनी वेळेत प्रवेश निश्चित करावा. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी आवाहन केले की, “शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. आरटीई अंतर्गत मिळणारी ही प्रवेश संधी सर्व पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी पालकांनी वेळेत आणि नियमबद्ध पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.”
ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३२० रिक्त जागा उपलब्ध होते व आतापर्यंत 8 हजार 539 प्रवेश झाले आहेत.
अधिक माहितीसाठी:
संकेतस्थळ: https://student.maharashtra.gov.in तसेच मदतीसाठी स्थानिक शिक्षण विभाग / BEO कार्यालय येथे संपर्क करावा, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे. याआधी देखील तिसऱ्या प्रवेश टप्प्यात देखील मुदतवाढ करण्यात आली होती. तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रियेची तारिख ही 07 मे पर्यंत होती मात्र मुदतवाढ देऊन अंतिम तारीख 14 मे करण्यात आली होती.