फोटो सौजन्य - Social Media
छत्रपती संभाजीनगर: यावर्षी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा अधिक पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाने अभिनव टोकन पद्धतीचा उपक्रम राबविला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला असून, संपूर्ण जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची तपासणी अधिक शिस्तबद्ध, उत्तरदायी आणि पारदर्शक व्हावी, यासाठी टोकन प्रणालीची आखणी करण्यात आली आहे. या पद्धतीनुसार प्रत्येक परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येनुसार टोकन क्रमांक निश्चित केले जातात. अनुक्रमांक एकपासून शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येकासाठी स्वतंत्र टोकन दिले जाते. त्यानुसार प्रत्येक टोकनची जबाबदारी एका शिक्षकावर सोपवली जाते.
प्रत्येक शिक्षकाकडून किमान २५ विद्यार्थ्यांची तपासणी केली जाते. तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित टोकन क्रमांकाखाली त्या शिक्षकाचे नाव नोंदवले जाते. विशेष म्हणजे तपासणी झाल्यानंतर टोकन विद्यार्थ्यांच्या खिशात ठेवले जाते. त्यामुळे कोणत्याही क्षणी केंद्र संचालक किंवा भरारी पथक तपासणीसाठी आल्यास विद्यार्थ्यांकडे असलेले टोकन आणि त्यावर नमूद शिक्षकाचे नाव पाहून तपासणीची खातरजमा करता येते. ही पद्धत केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष पडताळणीसाठी उपयुक्त ठरत आहे. केंद्र संचालकांकडे स्वतंत्र रजिस्टर ठेवण्यात येते, ज्यामध्ये टोकन क्रमांक, तपासणी करणारे शिक्षक आणि संबंधित विद्यार्थ्यांची माहिती नोंदवली जाते. यामुळे तपासणीची संपूर्ण प्रक्रिया अधिक संगठित आणि विश्वासार्ह बनली आहे.
भरारी पथकांना या पद्धतीमुळे मोठी मदत होत आहे. ते कोणत्याही विद्यार्थ्याची अचानक तपासणी करून त्याच्या टोकनद्वारे आधी झालेल्या तपासणीची पुष्टी करू शकतात. यामुळे गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सतत सजगतेची भावना निर्माण झाली आहे. “कोणत्याही क्षणी तपासणी होऊ शकते” ही जाणीव असल्याने विद्यार्थी अधिक प्रामाणिकपणे परीक्षा देताना दिसत आहेत. त्याचबरोबर शिक्षकांमध्येही जबाबदारीची भावना वाढली असून, तपासणी प्रक्रियेत अधिक गांभीर्याने सहभाग घेतला जात आहे.
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, शिस्त आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर या पद्धतीची काटेकोर अंमलबजावणी सुरू असून प्रशासनाकडून सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. एकूणच, टोकन पद्धतीमुळे कॉपीमुक्त अभियानाला नवे बळ मिळाले असून परीक्षा प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि प्रभावी बनत आहे. भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






