फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता १० वीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरू झाली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात मराठी (प्रथम भाषा) विषयाच्या प्रश्नपत्रिकेबाबत काही ठिकाणी अनुचित प्रकार घडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. विशेषतः जालना आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका फुटल्याची किंवा ती व्हायरल झाल्याची माहिती काही माध्यमांतून प्रसिद्ध झाली. मात्र, शिक्षण मंडळाने या आरोपांची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.
जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, बदनापूर, ता. बदनापूर, जि. जालना येथील परीक्षा केंद्र क्रमांक ३०५० येथे मराठी प्रथम भाषेचा पेपर फुटल्याची माहिती काही वृत्तवाहिन्यांनी दिली होती. याबाबत शिक्षण मंडळाने तातडीने चौकशी केली असता, सोशल मीडियावर व्हायरल झालेली दोन पाने मूळ प्रश्नपत्रिकेची नसल्याचे स्पष्ट झाले. ती पाने खासगी प्रकाशकाने प्रकाशित केलेली होती, तसेच काही हस्तलिखित मजकूरही आढळला. या हस्तलिखितात प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न व त्यांची उत्तरे असल्याचे आढळून आले, परंतु प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका फुटल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे हा प्रकार पेपरफुटीचा नसून गैरमार्गाने विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने झाल्याचे दिसून येते. याबाबत जिल्हा प्रशासनाने सविस्तर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव व कोठारी या परीक्षा केंद्रांवर मराठी (प्रथम भाषा) विषयाची प्रश्नपत्रिका मोबाईलद्वारे व्हायरल झाल्याची बातमी काही माध्यमांतून प्रसिद्ध झाली होती. शिक्षण मंडळाने याबाबत सखोल चौकशी केल्यानंतर, प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका फुटल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. परंतु, प्रश्नपत्रिकेतील काही भाग सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे आढळून आले. हा प्रकार परीक्षेच्या शिस्तभंगास कारणीभूत ठरू शकतो, त्यामुळे दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्रशाला, तळणी, ता. मंठा, जि. जालना या केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पालकांना बाहेर काढले. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, असे शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी स्पष्ट केले आहे. या तिन्ही घटनांमध्ये प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका फुटीचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र, गैरमार्गाने विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने काही मजकूर व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी शिक्षण मंडळाने कठोर भूमिका घेत दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत.