विलेपार्ले येथील साठये महाविद्यालयात दरवर्षी जनसंवाद विभागातर्फे “माध्यम महोत्सव” उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही नव्या जोमात माध्यम महोत्सव १० डिसेंबर आणि ११ डिसेंबर २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या माध्यम महोत्सवाची संकल्पना”महाराष्ट्र” अशी आहे.ह्या वर्षी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी “मराठी” भाषेला “अभिजात भाषेचा” दर्जा मिळाला. तसेच महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते. महाराष्ट्रातील विविधता प्रत्येक जिल्ह्यातील वेगवेगळ्या बोली भाषेतून, संस्कृतीतून, परंपरेतून आणि खाद्यपदार्थांमधून झळकते. हीच विविधता साठ्ये महाविद्यालयातील माध्यम व जनसंवाद विभाग ‘महाराष्ट्र’ या संकलपनेतून साकारण्याचा प्रयत्न करणार आहे.प्राचार्य डॉ.माधव राजवाडे, उपप्राचार्य प्रमोदिनी सावंत, डॉ.सूरज पंडित आणि प्राध्यापक गजेंद्र देवडा यांच्या नेतृत्वाखाली माध्यम विभागाचे विद्यार्थी पूर्ण जोशाने,आनंदाने आणि उत्साहाने त्याची तयारी करत आहेत.
माध्यम महोत्सवाचे उदघाटन सतीश राजवाडे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या दिवसांत विविध मान्यवर आणि सेलिब्रेटी मंडळींची मांदियाळी या महोत्सवाला भेट देणार आहेत.तरुणाईला आकर्षित करण्यासाठी या महोत्सवात इन्फोटेनमेंट स्वरूपातील स्पर्धांचे आयोजन विद्यार्थ्यांद्वारे करण्यात येणार आहे. फॅशन शो, गायन, नृत्य, ठिपक्यांची रांगोळी अश्या अनेक स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधून महाराष्ट्र व महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संस्कृती आणि परंपरेचा अनुभव घेता येईल. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही महोत्सवात असणार आहेत. तसंच त्याअंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावं असं आवाहन माध्यम विभागातर्फे करण्यात आले आहे.
माध्यम महोत्सव
माध्यम महोत्सव हा मास मीडिया विभागाचा वार्षिक आंतरमहाविद्यालयालयीन महोत्सव आहे.माध्यम विश्वातील विविध संकल्पना घेऊन हा महोत्सव आकाराला येतो. २०११ साली जनसंवाद विभागाचे विभागप्रमुख गजेंद्र देवडा यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यम महोत्सवाची विद्यार्थ्यांकडून सुरुवात झाली. एका वर्गात सुरु झालेल्या या महोत्सवाने गेल्या दहा वर्षात मुंबईतील लोकप्रिय फेस्ट म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. माध्यम जत्रा,माध्यमगड, डिजीवल्ड, पुस्तकोत्सव, चित्रशताब्दी या आणि अशा विविधांगी संकल्पना घेऊन हा २ अथवा ३ दिवसीय महोत्सव साजरा केला जातो.
विद्यार्थ्यांना व्यावसायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विविध पातळीवर काम करता यावे, त्यातील बारकावे समजावे आणि इन्फोटेन्मेंट पद्धतीने त्यांना याचा आनंद घेता यावा हा यामागचा हेतू आहे.माध्यम क्षेत्रातील अनुभवी,मान्यवर या महोत्सवाला भेटी देतात. संशोधनपर पोस्टर्स, थीमनुसार स्पर्धा, मान्यवरांचे व्याख्यान, प्रदर्शने इत्यादी गोष्टींनी हा महोत्सव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करत असतात. माध्यम महोत्सवच्या अखेरच्या दिवशी माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलनाचे आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने आजी आणि माजी विद्यार्थ्यांची भेट होते.
SSC MTS Result 2024: 9583 जागांवर भरती असलेल्या एसएससी एमटीएस परीक्षेचा निकाल कधी येणार?