फोटो सौजन्य - Social Media
विद्यार्थ्यांकडून सातत्याने येणाऱ्या मागण्यांची दखल घेत मुंबई विद्यापीठ प्रशासनाने एलएल.एम. सीईटी परीक्षेच्या पुनर्नियोजनाचा विषय सध्या सक्षम प्राधिकरणांच्या विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नसला, तरी परीक्षा वेळापत्रकात बदल किंवा इतर सुधारणा करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, एआयबीई आणि एलएल.एम. सीईटी या दोन्ही परीक्षा कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यास विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षा तारखेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून विद्यार्थ्यांचे लक्ष आता विद्यापीठाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.
विद्यापीठ प्रशासनाने सर्व संबंधित विद्यार्थ्यांना नियमितपणे मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. एलएल.एम. सीईटी २०२६ संदर्भातील पुढील निर्णय, सुधारित वेळापत्रक आणि इतर अधिकृत सूचना याच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.






