१४ वर्षांनंतर शेखर सुमन पुन्हा सज्ज; ‘शेखर टुनाइट’मधून रंगणार अनफिल्टर्ड संवाद
जवळपास चौदा वर्षांनंतर, भारतीय मनोरंजनविश्वात संवादाची एक वेगळी ओळख निर्माण करणारे शेखर सुमन पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा आवाज, उपस्थिती आणि संवादाची शैली एका संपूर्ण काळाची ओळख बनली होती. आता तोच आवाज पुन्हा परतला आहे आणि यावेळी तो घेऊन आला आहे एक वैयक्तिक, भावनिक आणि सत्याशी जोडलेला शो म्हणजे शेखर टुनाइट. आजच्या काळात अनेक संवाद हे आधीच ठरवलेले, बनावट किंवा फक्त व्हायरल होण्यासाठी तयार केलेले असतात. पण यावेळी शेखर टुनाइट या शो मधून प्रेक्षकांना एक वेगळी बाजू पाहायला मिळणार आहे. येथे मुलाखती नाहीत, परफॉर्मन्स नाहीत, तर दोन व्यक्तींमध्ये घडणारे खरा आणि नैसर्गिक संवाद पाहायला मिळणार आहेत.
शेखर टुनाइटचा फर्स्ट लूक आणि अधिकृत ट्रेलर मोठ्या आउटडोअर कॅम्पेन आणि डिजिटल लॉन्चद्वारे प्रदर्शित करण्यात आला. यामुळे शेखर सुमन यांना पाहत मोठं झालेल्या प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पॉडकास्ट आणि डिजिटल टॉक शो लोकप्रिय होण्याच्या खूप आधी, शेखर सुमन यांनी भारतीय टेलिव्हिजनवर विनोद, उपरोध आणि सेलिब्रिटी संवादाला एक वेगळी ओळख दिली होती. त्यांच्या संवादाची शैली आजही तितकीच खास मानली जाते. हा शो संगानी ब्रदर्स आणि कॉबल्ड स्ट्रीट यांच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. या दोन्ही संस्थांनी मिळून एक अनस्क्रिप्टेड आणि नैसर्गिक संवादांवर आधारित शो साकारला आहे. येत्या १५ मे पासून हा शो त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सुरू होणार आहे.
Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!
आपल्या पुनरागमनाबद्दल बोलताना शेखर सुमन म्हणाले, “माझ्यासाठी शेखर टुनाइट हा फक्त सेलिब्रिटी इंटरव्ह्यू शो नाही. हा खऱ्या भावना आणि माणसांमधल्या नैसर्गिक संवादांचा प्रवास आहे. आपल्याला कायम लक्षात राहतात ते आधीपासून ठरवलेले संवाद नसतात, तर अचानक आलेला हशा, काही शांत क्षण आणि लोक जेव्हा स्वतःसारखे वागतात ते क्षण असतात. मला नेहमी वाटतं की सगळ्यात सुंदर संवाद तेव्हाच होतात, जेव्हा लोक कॅमेऱ्याचं भान विसरतात. तीच गोष्ट मला आजही उत्साहित करते. इतक्या वर्षांनंतर मला पुन्हा अशा मंचावर यायचं होतं, जिथे संवाद मनापासून होतात, जिथे भावना महत्त्वाच्या असतात आणि जिथे प्रामाणिकपणाला जास्त किंमत असते.”
हा शो तयार करणारे अध्ययन सुमन म्हणाले, “हा शो माझ्यासाठी खूप खास आणि भावनिक प्रवास आहे. हा फक्त एका शोचं पुनरागमन नाही, तर एका काळाचा, एका आवाजाचा आणि भारतीय मनोरंजनविश्वावर वेगळी छाप सोडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या परतीचा क्षण आहे. माझ्यासाठी आणि आमच्या पिढीसाठी शेखर सुमन हे खूप मोठं नाव आहे. लोक आजही त्यांची विनोदबुद्धी, त्यांचे मोनोलॉग्स आणि संवाद साधण्याची खास शैली विसरलेले नाहीत. मी लहानपणापासून हे सगळं जवळून पाहिलं आहे आणि ती जादू माझ्या मनात कायम राहिली. इतक्या वर्षांनंतर त्यांना पुन्हा त्याच ऊर्जा आणि आत्मविश्वासासोबत पाहून मला खूप आनंद झाला. खरं सांगायचं तर त्यांच्यात काहीच बदललेलं नाही, उलट ते आणखी प्रभावी झाले आहेत. मला सर्वात जास्त आनंद याचा आहे की त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा आणि ती खास जादू आजही तशीच जपली आहे.माझ्या विचारांवर विश्वास ठेवून हा शो माझ्या पद्धतीने तयार करण्याचं स्वातंत्र्य दिल्याबद्दल मी माझे निर्माता आणि क्रिएटिव्ह पार्टनर धर्मेश संघानी यांचे मनापासून आभार मानतो. तसेच या संपूर्ण प्रवासात कायम साथ देणाऱ्या ऋतिका बजाज यांचेही विशेष आभार. त्यांनी या शोसाठी खूप मेहनत घेतली आहे. तसेच शेखर टुनाइट साकार करण्यासाठी मेहनत घेतलेल्या संपूर्ण टीमचेही मी मनापासून आभार मानतो.”
शेखर टुनाइटमध्ये चित्रपट, राजकारण, संगीत, क्रीडा, व्यवसाय आणि संस्कृती क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार आहेत. या शोमध्ये विनोद, भावना, उपरोध आणि मनमोकळ्या संवादांचा खास संगम पाहायला मिळणार आहे. डिजिटल प्रेक्षकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या शोमध्ये ठरवून केलेल्या फॉरमॅटपेक्षा नैसर्गिक आणि मनापासून होणाऱ्या संवादांना अधिक महत्त्व दिलं जाणार आहे.






