सौजन्य - नवराष्ट्र टीम
अखेर सोमवारी (ता. ११) दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर भक्ष्याच्या शोधात फिरत असताना बिबट्या कंपनी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. पकडण्यात आलेला बिबट्या सुमारे साडेतीन ते चार वर्षांचा प्रौढ नर असल्याची माहिती वन विभागाने दिली. ही संपूर्ण मोहीम पुणे वनसंरक्षक आशिष ठाकरे, जुन्नर उपवनसंरक्षक प्रशांत खाडे आणि सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कांक, वन कर्मचारी इंदलकर, जगताप, पिसाळ तसेच संपूर्ण चाकण वन विभागाच्या पथकाने मोहिमेत सहभाग घेतला.
कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला
याशिवाय माणिकडोह बचाव केंद्राचे महेंद्र धोरे व डॉ. अविनाश विसाळकर, ‘रेस्क्यू’ चॅरिटेबल ट्रस्टचे नचिकेत उत्पात, किरण रहाळकर, एजाज शेख आणि त्यांच्या पथकानेही महत्त्वाची भूमिका बजावली. म्हाळुंगे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय ढमाले तसेच मर्सिडीज-बेंझ प्रशासनाचे सारंग जोशी आणि व्यंकटेश कुलकर्णी यांनीही मोहिमेस सहकार्य केले. दोन दिवसांच्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले. कंपनीतील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.






