फोटो सौजन्य - Social Media
युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) ने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि नौदल प्रबोधिनी (NA) परीक्षा (द्वितीय), 2025 साठी अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना 28 मे 2025 रोजी ‘Examination Notice No. 10/2025-NDA-II’ या क्रमांकाने प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही परीक्षा 156 व्या NDA कोर्ससाठी आणि 118 व्या इंडियन नेव्हल अकॅडमी (INAC) कोर्ससाठी आहे, जे 1 जुलै 2026 पासून सुरू होणार आहेत.
पात्र असलेले अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार 17 जून 2025 पर्यंत नवीन युपीएससी पोर्टलवर (https://upsconline.nic.in) ऑनलाईन अर्ज करू शकतात. लेखी परीक्षा 14 सप्टेंबर 2025 रोजी भारतभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 2 जानेवारी 2007 ते 1 जानेवारी 2010 दरम्यान जन्मलेले उमेदवार पात्र आहेत. उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याची हमी द्यावी लागते. जर प्रशिक्षणादरम्यान विवाह झाला, तर उमेदवारास त्वरित प्रशिक्षणातून वगळण्यात येईल व प्रशिक्षण खर्चाची परतफेड करावी लागेल.
उमेदवारांची निवड UPSC कडून घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. त्यानंतर सेवा निवड मंडळाकडून (SSB) बौद्धिक व व्यक्तिमत्व मूल्यांकन चाचणी (SSB Interview) घेतली जाईल. अंतिम गुणवत्ता यादीसाठी दस्तऐवज तपासणी व वैद्यकीय चाचणी केली जाईल. उमेदवारांनी https://upsconline.nic.in या पोर्टलवर युनिक रजिस्ट्रेशन आणि कॉमन अर्ज फॉर्म वापरून ऑनलाईन अर्ज करावा. एकदा अर्ज सबमिट केल्यावर त्यात कोणताही बदल करता येणार नाही. आधार कार्ड ओळखपत्र म्हणून वापरण्याचा सल्ला दिला आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 जून 2025 रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे. अर्ज शुल्क सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्गासाठी ₹100 असून, अनुसूचित जाती/जमाती, महिला, तसेच JCOs/NCOs/ORs यांचे पाल्य यांच्यासाठी शुल्क माफ आहे.
NDA आर्मीमध्ये 208 जागा (12वी पास कोणत्याही शाखेतून), NDA नेव्हीमध्ये 42 जागा (PCM), NDA एअरफोर्स फ्लाइंग 92 जागा (PCM), ग्राउंड टेक्निकल18 जागा (PCM), ग्राउंड नॉन-टेक्निकल 10 जागा (PCM), तर नेव्हल अकॅडमीमध्ये 36 जागा (12वी पास PCM सह) आहेत. ही सुवर्णसंधी आहे देशसेवेसाठी झपाटलेल्या युवक-युवतींसाठी. इच्छुकांनी वेळेत अर्ज करून तयारीला लागावे.