फोटो सौजन्य - Social Media
मुंबईतील करी रोड येथील व्ही. व्ही. के. शर्मा ज्युनिअर कॉलेज कायमस्वरूपी बंद झाल्याने या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या बारावीच्या 100 हून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी ते फॉर्म भरू शकत नसल्याने त्यांना परीक्षेलाच बसता येणार की नाही, याबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघाने विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या कॉलेजमधील अनेक विद्यार्थी मागील 2–3 वर्षांत एका-दोन विषयांत नापास झाल्यामुळे पुन्हा बारावीची परीक्षा देत आहेत. परंतु असे विद्यार्थी ‘नियमित विद्यार्थी’ मानले जात असल्याने त्यांना खाजगीरित्या फॉर्म भरता येत नाही. नियमांनुसार त्यांचे परीक्षा फॉर्म त्याच कॉलेजमार्फत भरले जाणे आवश्यक आहे.
पण कॉलेजच बंद झाल्याने फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. विद्यार्थी आणि पालक कॉलेजच्या दाराशी वारंवार धाव घेत असूनही त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जाते. सध्या बारावी परीक्षेच्या फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू आहे. मात्र व्ही. व्ही. के. शर्मा कॉलेज बंद असल्यामुळे विद्यार्थी विविध कार्यालयांची पळापळ करत आहेत. तरीही त्यांना अद्याप यश आलेले नाही.
थोटलूर डेविड भीमप्पा या विद्यार्थ्याने तर शिक्षण निरीक्षकांना पत्र लिहून, “मला बारावीच्या परीक्षेत बसू द्या,” अशी विनंती केली आहे. तो 2023 मध्ये परीक्षेस बसला होता, परंतु फक्त ‘बुक-कीपिंग’ या एका विषयात नापास झाल्यामुळे त्याचे पुढील शिक्षण थांबले आहे. मुंबई ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघाचे उपाध्यक्ष एस. एल. दीक्षित यांनी शिक्षण उपसंचालक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय सचिवांना पत्र लिहून, या 100 हून अधिक विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था करून बारावीच्या परीक्षेस बसण्याची तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
दीक्षित यांनी सांगितले की, “हे विद्यार्थी नियमित असल्याने त्यांचे फॉर्म कॉलेजकडूनच भरावे लागतात. कॉलेज बंद झाल्यामुळे ते पूर्णपणे अडचणीत आले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्यापासून वाचवावे.






