फोटो सौजन्य - Social Media
UPSC ही देशातली सगळ्यात कठीण परीक्षा मानली जाते. ती पास होण्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द आणि सातत्य लागतं. अशा परीक्षेत यश मिळवणं म्हणजे साधं काम नाही. पण अंसार शेख या तरुणानं हे अशक्य वाटणारं स्वप्न सत्यात उतरवलं. मूळचा जालन्याच्या एका छोट्याशा गावातला अंसार, ज्याचे वडील एक साधे रिक्षाचालक. घरची परिस्थिती फारच बेताची होती. शिक्षण घेताना अडथळे आलेच, पण तरीही त्यानं हार मानली नाही. अंसारनं UPSC ची तयारी करताना दररोज 12-13 तास अभ्यास केला.
2015 साली अवघ्या 21व्या वर्षी अंसार शेखनं जेव्हा UPSC परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अंतिम यादीत 361वा क्रमांक मिळवला, तेव्हा तो देशातील सर्वात तरुण IAS अधिकारी ठरला. विशेष म्हणजे ही त्याची पहिलीच चाचणी होती. ज्या परीक्षेला वर्षानुवर्षे मेहनत करूनही अनेकजण अपयशी ठरतात, ती अती कठीण परीक्षा अंसारनं जिद्द, चिकाटी आणि अथक अभ्यासाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे पार केली.
अंसारचं शिक्षण पुण्यातल्या प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं. तिथून त्यानं पॉलिटिकल सायन्स या विषयात पदवी घेतली आणि ग्रॅज्युएशनला तब्बल 73 टक्के गुण मिळवले. लहानपणापासूनच त्याच्या आयुष्यात संघर्ष होताच वडील रिक्षाचालक, घरात आर्थिक अडचणी, शिक्षणासाठी मर्यादित सुविधा पण या सगळ्याला बाजूला सारत त्यानं स्वतःची दिशा ठरवली आणि त्यासाठी झोकून दिलं.
सध्या अंसार शेख पश्चिम बंगाल राज्यातील कूचबिहार जिल्ह्यात ADM (Additional District Magistrate) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. प्रशासनात आपलं काम प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने बजावत असतानाच, अंसार सोशल मीडियावरही सक्रिय आहे. त्याच्या इंस्टाग्रामवर 3.43 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, आणि तिथूनही तो तरुणांशी संवाद साधत त्यांना प्रेरणा देत असतो. असं म्हणता येईल की अंसार शेख याची ही कहाणी केवळ यशाची नाही, तर एका सामान्य परिस्थितीतून असामान्य प्रवास घडवणाऱ्या मुलाची आहे. त्याचं जीवन हे अनेकांसाठी एक आशेचा किरण ठरलं असून, संघर्ष करणाऱ्या लाखो तरुणांसाठी तो आज एक जिवंत प्रेरणास्थान बनला आहे.