(फोटो- istockphoto)
पुणे: गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात पुणे पोलिसांनी तब्बल ३१ गुन्हे नोंदवले आहेत. ३१ गुन्ह्यांत ध्वनीप्रदूषण प्रकरणात ११ गुन्हे नोंदवले आहेत. तर छेडछाड, किरकोळ वाद, विसर्जनादिवशी झालेले वाद अशा १९ गुन्हे नोंद केले आहेत. त्यासोबतच ६ एनसीच्या तक्रारीही दाखल झाल्या आहेत. दरम्यान, सहकारनगर पोलिसांनी डीजेप्रकरणात थेट अध्यक्ष आणि डीजे मालकांवर गुन्हे नोंदवले आहेत.
गणेशोत्सव काळात कर्णकर्कश आवाजात डीजे लावण्यास तसेच लेझर लाईट लावण्यास सक्त मनाई केली होती.याबाबत सूचनाही वेळोवेळी दिलेल्या होत्या. यानंतरही उपनगरासह मुख्य मिरवणूकीत डीजेचे थर लाऊत मोठा आवाज वाढवत डीजेचा दणदणाट केला गेला. दरम्यान, पोलिसांनी आवाजाच्या मोजणीसाठी पथके नेमली होती. या पथकांनी सर्व भागात फिरून आवाजाची पातळी मोजली आहे. त्यानुसार पुणे पोलिसांनी आता कारवाई केली आहे. आतापर्यंत ११ गुन्हे ध्वनीप्रदूषणाबाबत नोंदवले गेले आहेत. यात आणखी कारवाई सुरू असून, स्थानिक पातळीवर काम सुरू आहे. दुसरीकडे लेझर बीम लाईटबाबत मात्र अद्यापतरी एकही गुन्हा नोंदवला गेलेला नाही.
या गोष्टींचा समावेश
काही प्रकरणात मंडळाच्या अध्यक्षांनी लाऊडस्पिकरसाठी कोणतीही परवानगी घेतली नाही. दिलेल्या आदेशाचे उल्लघंन केले. गणपती उत्सवात साऊंड सिस्टीमचा वापर केला. आवाजाच्या मर्यादाचे उल्लघंन केले. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करून यंत्र सामुग्रीबाबत हयगयीचे वर्तनकरून आवाजाची मर्यादा ओलांडली. तसेच नागरिकांना अडथळा निर्माणकरून धोका निर्माण केला. तसेच, दोन्ही मंडळांनी विहीत क्षमतेचे उल्लघंन न करणेबाबत नोटीस घेण्यास नकार देऊन अटी व शर्तीचा भंग केला आहे.
या मंडळांचा समावेश
सहकारनगर पोलिसांनी दोन गुन्हे नोंदवले आहेत. त्यात अखिल गुरूदत्त तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष तसेच लाऊडस्पीकर चालक आणि शिवतीर्थ मित्र मंडळाचे अध्यक्ष व लाऊड स्पीकर चालक यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. भारतीय न्याय संहिता २२३, २८५, २८९, २९२, २९३ सह पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ चे कलम १५ सह ध्वनी प्रदूषण विनियमन व नियंत्रण २००० चे कलम ३,४,५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम ३३/१३१,३६/ १३४,३७/१३५, ६८/१४० नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
अदखलपात्र ६ गुन्हे
गणेशोत्सवात पुणे पोलिसांनी कडेकोट उपाययोजना केली होती. दहा दिवसांच्या काळात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात १९ गुन्हे हे दहा दिवसात झालेली हाणामारी, गर्दीत धक्का लागून झालेले किरकोळ वाद, छेडछाड तसेच इतर असे आहेत. यातच तरुणांमध्ये वाद-विवाद व इतर अशा ६ एनसी देखील नोंदवल्या गेल्या आहेत. तर ११ गुन्हे ध्वनीप्रदूषणाचे आहेत.