संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातील सहकारनगर परिसरात धक्कादायक घटना घडली असून, अत्याचार तसेच अश्लील कृत्य केल्याने १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संकेत राजेश मोहिले (वय २६, रा. धम्मपाल संघाजवळ, ३१८ भवानी पेठ आणि मोहननगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि आरोपी संकेत मोहिले यांची ओळख होती. मोहिलेने त्याला आमिष दाखवून वर्षभरापूर्वी तळजाई टेकडी परिसरात नेले. तेथे त्याने मुलाबरोबर अश्लील कृत्य, तसेच अनैसर्गिक अत्याचार केले. मोहिलेने मोबाइलवर फोटो काढले. नंतर त्याने मुलाला धमकाविण्यास सुरुवात केली. मुलाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून त्याला धमकावले.
त्रासामुळे मुलाने १५ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. चौकशीत मोहिलेने मुलावर अत्याचार करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर याप्रकरणी मोहिलेला अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक पवार अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; निवृत्त ‘पोलीस महासंचालकां’च्या मेव्हण्याचा फ्लॅट फोडला
सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
पुण्यात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पती तसेच सासरच्या जाचाला कंटाळून शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन विवाहितांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कोंढवा आणि विमानतळ परिसरात या घटना घडल्या असून, याप्रकरणी पती व इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले.पहिल्या घटनेत नयना प्रकाश माघाडे (वय २६, रा. विठ्ठल निवास, संतनगर, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे आहे. याप्रकरणी पती प्रकाश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नयना यांचे भाऊ जय खरात (वय २८, रा. निंबगाव जाळी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नयना यांचा प्रकाश याच्याशी चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर प्रकाशने नयना यांचा छळ सुरू केला. माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. पैसे न आणल्याने मारहाण करून मानसिक व शारिरीक छळ केला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून नयना यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.
दुसरी घटना कोंढवा भागात घडली असून, पतीच्या छळामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अश्विनी राहुल माने (वय ३६, रा. कासट काॅलनी, साईनगर, कोंढवा बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती राहुल याच्यासह नातेवाईक महिलेवर गुन्हा दाखल केला. याबाबत अश्विनी यांच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अ्श्विनीचा पती राहुल तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. तिला त्याने मारहाण केली होती. छळामुळे तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक निरीक्षक राकेश जाधव तपास करत आहेत.