संग्रहित फोटो
बारामती : राज्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज आत्महत्येच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता बारामतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बारामतीमधील भिगवण रोडवरील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत व्यवस्थापक शिवशंकर मित्रा (वय52 वर्ष) यांनी काल गुरुवारी 17 जुलै रोजी रात्री बँकेच्या शाखेतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिवशंकर मित्रा हे मूळचा उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. बँकेच्या दबावामुळे मी आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये मित्रा यांनी म्हटलं आहे.
चिठ्ठीत काय लिहिलंय?
शिवशंकर मित्रा यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले की, “मी शिवशंकर मित्रा, मुख्य प्रबंधक बँक ऑफ बडोदा बारामती, मी आज बँकेच्या अतिरिक्त दबावाच्या कारणामुळे आत्महत्या करत आहे. माझी बँकेकडे विनंती आहे की, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त दबाव टाकू नका. सर्वांना आपापल्या जबाबदारीची पूर्णपणे जाणीव आहे आणि ते शंभर टक्के आपले योगदान देत असतात.”
मी पूर्णपणे शुद्धीत असताना व स्वतःच्या इच्छेने आत्महत्या करत आहे. त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाची कोणतीही चूक नाही. कोणालाही जबाबदार धरू नये. मी फक्त बँकेच्या प्रचंड दबावामुळे आत्महत्या करत आहे. पत्नी प्रिया यांना उद्देशून त्यांनी, प्रिया, मला माफ कर. माही मला माफ कर! असे त्यांनी पत्नी प्रिया आणि मुलगी माही यांना लिहिलेलं आहे. शक्य झाल्यास माझे डोळे दान करावेत, अशी देखील इच्छा शिवशंकर मित्रा यांनी व्यक्त केली आहे.
हे सुद्धा वाचा : नशेसाठी ‘याबा’ गोळ्यांची विक्री; पोलिसांनी तस्कराला सापळा रचून पकडले
पुण्यात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
पत्नी व तिच्या मित्राच्या होणाऱ्या सततच्या त्रासातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाना पेठेत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अतुल मारुती कदम (वय ३९, रा. बालाजी काॅम्प्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अतुल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नी सोनाली अतुल कदम (वय ३१, रा. साडेसतरानळी, हडपसर), तसेच तिचा मित्र कृष्णा शिंदे (रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अतुल यांची आई माधुरी मारुती कदम (वय ६१) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.