संग्रहित फोटो
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे तुषार गारमेंटचे मालक सुनील खटावकर यांच्या घरात झालेल्या सिलिंडरच्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या दुर्घटनेत घरात कोणी नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. स्फोटात घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. घराच्या खिडकीच्या काचा फुटून शंभर मीटर अंतरापर्यंत पडल्या होत्या. यामुळे घरात आणि गल्लीत अक्षरशः काचांचा खच पाडला होता. घटना समजताच बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महागावतील परीट गल्लीत कापड व्यावसायिक सुनील खटावकर यांचे घर आहे. त्यांच्या कुटुंबात दोन लहान मुलासह आठजण राहतात. घटनेच्या अगोदर श्री खटावकर हे दुकानात होते. पत्नी घरीच होती. स्फोट झाल्यानंतर शेजारील मुलाने माहिती दिली. घरी आल्यानंतर पत्नीला विचारले, तेव्हा तिने आम्ही सर्वजण गणपतीच्या आरतीला गेलो होतो, असे सांगितले. त्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली. मात्र घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. सदरच्या घटनेबाबत आपली कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे खटावकर यांनी पोलीसांना सांगितले आहे. दरम्यान, बीट हवलदार आर.वाय. नाईक, पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास भोसले, मंडल अधिकारी आर.के. तोळे यांनी भेट देऊन पंचनामा केला.
घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रशांत शिंदे, पोलीस पाटील प्रदीप कांबळे, व्यापारी संघटना, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले. सर्वांनी खटावकरांना धीर देत घरातील व रस्त्यावरील सर्व काचा एकत्रित केल्या.
शनिवारी अनंत चतुर्दशी असल्याने मंडळांच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणूका सुरू होत्या. फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. त्यातच हा सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याने परिसर हादरला. फटाक्यांमुळे सुरुवातीला नेमका स्फोट झाल्याचे कोणाच्या लक्षात आले नव्हते, मात्र घराचे सर्व दरवाजे निखळले, खिडक्यांच्या स्लाइडिंगच्या काचा फुटून शंभर मीटर अंतरावर पडल्यानंतर सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सर्वांच्या लक्षात आले. खटावकर यांच्या घरात गणेशोत्सवात दरवर्षी मंडळातील कार्यकर्त्यांना विसर्जनानंतर जेवण दिले जाते. अर्धे जेवण तयार झाल्यानंतर गणेशाच्या आरतीसाठी सर्वजण गेले होते. त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. स्फोटानंतर घरातील दरवाजे निखळले, दरवाज्यावर असलेल्या गणेश मूर्तींना मात्र काहीही झालेले नव्हते.