File Photo : Murder_Crime
अमरावती : प्रेम त्रिकोणातून एका तरुणीची हत्या झाली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने एका तरुणीची चाकूने हल्ला करून हत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि.8) रात्री आठच्या सुमारास राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील सुपर एक्स्प्रेस हायवेवरील एका मंदिराजवळ घडली. घटनेनंतर मारेकरी तरुणी फरार झाली.
शुभांगी (२६) असे मृत युवतीचे नाव आहे. शुभांगीच्या परिचयातील तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्याचे शुभांगीसोबतही प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याच्या प्रेयसीला होता. त्या कारणावरून त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे तरुणाने आपल्या प्रेयसीची शुभांगीसोबत भेट घालून देण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, मंगळवारी शुभांगी ही एका मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत आली होती. त्यामुळे तरुणाने आपल्या प्रेयसीची शुभांगीसोबत भेट घालून देण्यासाठी रात्री आठ वाजताच्या सुमारास तिला सुपर एक्स्प्रेस हायवेवरील एका मंदिराजवळ बोलवले.
तरुणाच्या प्रेयसीने घातला वाद
शुभांगी तेथे पोहोचल्यावर तरुणाच्या प्रेयसीने तिच्यासोबत वाद घातला. या वादात तिने शुभांगीवर चाकूने हल्ला चढविला. त्यात ती गंभीर जखमी झाली. तरुणाने शुभांगीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट यांनी आपल्या ताफ्यासह जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. पोलीस उपायुक्त गणेश शिंदेही तेथे पोहोचले. सध्या याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.