किनवट मध्ये हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची कारवाई करण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
Crime News : किनवट : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई (Nanded News) करत मोठ्या प्रमाणावर मोहफुलापासून तयार केलेले रसायनयुक्त द्रव्य जप्त करून नष्ट केले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Crime News)
किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोधडी बिट परिसरातील मौजे डोंगरगाव येथे काही दिवसांपासून हातभट्टी दारू तयार करून तिची चोरटी विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून मासरेड मोहिम राबविण्यात आली. दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास वाजण्याच्या सुमारास पो.हे. कॉ. प्रदीप आत्राम, बीट जमादार सिद्धार्थ वाघमारे, पो. कॉ. संजय राजने तसेच महिला पो. कॉ. मंजू पवार यांच्या पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन संशयित ठिकाणी अचानक छापा टाकला.
हे देखील वाचा : टिपू सुलतान हा पाकिस्तानचा नायक तर क्रिकेटचा सामना कशाला? खासदार संजय राऊतांची मॅचवरुन राजकीय टीका
दुर्गंधीयुक्त द्रव्य केले नष्ट
छाप्यादरम्यान आरोपी मोतीराम नागोराव हुरदुके (वय ४५ वर्षे, व्यवसाय शेती, रा. डोंगरगाव ता. किनवट) हा इसम आपल्या शेतातील घराच्या अंगणात हातभट्टी दारू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रसायन साठवून ठेवताना आढळून आला. पोलिसांनी तपासणी केली असता तीन निळ्या रंगाच्या प्लास्टिक टाक्यांमध्ये प्रत्येकी सुमारे २०० लिटर क्षमतेचे मोहफुलाचे फसफसते, आंबट व उग्र वासाचे रसायनयुक्त द्रव्य आढळून आले. एकूण सुमारे ६०० लिटर रसायन जप्त करण्यात आले. त्यापैकी १८० मिली क्षमतेच्या बाटलीमध्ये नमुना पंचासमक्ष सील करून रासायनिक विश्लेषणासाठी जप्त करण्यात आला. उर्वरित नाशवंत व दुर्गंधीयुक्त द्रव्य पंचनामा करून जागीच नष्ट करण्यात आले.
कारवाईत सुमारे ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पो. कॉ. संजय रांजणे यांच्या फिर्यादीवरून हाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) व (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पो. नि. गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सिद्धार्थ वाधमारे करीत आहेत. दरम्यान, किनवट पोलिसांनी अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेमुळे अशा बेकायदेशीर धंद्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
हे देखील वाचा : रामप्रहरी महापौर उतरल्या रस्त्यावर; नागरिकांशी संवाद साधत जाणून घेतल्या अडचणी






