File Photo : Suicide News
नागपूर : फार्मा कंपनीत कार्यरत एका मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह (एमआर) ने आर्थिक विवंचनेतून हॉटेलच्या खोलीत गळफास लावत आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सीताबर्डी पोलिस ठाण्यांतर्गत घडली. हेमंत रमेश भट्टड (वय 37, रा. बांते लेआऊट, उज्ज्वलनगर) असे मृताचे नाव आहे.
हेमंत हे एका फार्मा कंपनीत काम करत होते. शुक्रवारी कंपनीकडून मोदी क्र. 4 येथील हॉटेल सनस्टारमध्ये एक सेमिनार आयोजित करण्यात आला होता. इतर कर्मचाऱ्यांसह हेमंतही या सेमिनारसाठी आले होते. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अचानक प्रकृती बरी नसल्याचे सांगून ते हॉटेलच्या खोलीत आराम करण्यासाठी गेले. या दरम्यान त्यांनी खोलीत छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
हॉटेलच्या कर्मचाऱ्याने त्यांना या अवस्थेत पाहून घटनेची माहिती व्यवस्थापकाला दिली. घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. सीताबर्डी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. चौकशीत अलिकडेच हेमंत यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे ते तणावात असल्याची माहिती मिळाली आहे.