नववधूने सत्यनारायण पूजा होताच ठोकली धूम, गुन्हा दाखल (फोटो सौजन्य-X)
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये एक विचित्र घटना घडली. ‘पाच लाख रुपये घेऊन ये’ असा तगादा लावत विवाहितेला घरातून हाकलून लावल्यानंतर तिच्या संमतीशिवाय पतीने दुसरे लग्न केले. हा प्रकार १९ नोव्हेंबर २०११ ते ३ जून २०२५ दरम्यान चाडौल (ता.जि. बुलडाणा) येथे घडला. आता हे प्रकरण समोर आले आहे.
पती रामकिशन रेकनोत, सासू मथुरा रेकनोत, सासरा देवसिंग रेकनोत, नणंद शोभा रेकनोत भाया गोकुळ रेकनोत, जाऊ छाया रेकनोत (चाडौल ता.जि. बुलडाणा) अशी पीडितेचा छळ करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ३२ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता गेल्या काही महिन्यांपासून आपल्या मुलासह बालाजीनगर भागात राहत असून, तिचे लग्न १९ नोव्हेंबर २०११ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील रामकिशन रेकनोत याच्याशी झाले.
लग्नानंतर सुरुवातीचा संसार सुरळीत चालत असतानाच पतीच्या सांगण्यावरून ते दोघे बुलडाणा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी राहायला गेले. मात्र, तेथे सासू, सासरे, नणंद, दीर, जाऊ यांच्यासह पतीने तिला माहेरून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा लावला.
दरम्यान, पतीकडून झालेल्या त्रासामुळे पीडिता पतीसह पुन्हा छत्रपती संभाजीनगरला परतली. मात्र, येथेही तिच्यावर सतत दबाव टाकून पैसे आणण्याची मागणी सुरूच होती. एवढ्यावरच न थांबता पतीने तिच्या संमतीशिवाय दुसऱ्या महिलेसोबत १९ डिसेंबर २०२३ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील पवळ्याच्या मळ्यात लग्न उरकले. हे लग्न घरच्यांच्या संगनमताने पार पडले असून, दुसरे लग्न झाल्यानंतर देखील पतीचा त्रास थांबला नाही, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. त्यासाठी तिच्यावर मानसिक तसेच शारीरिक छळ केला गेला.
पीडितेने आपले वडील आणि नातेवाईकांच्या मदतीने सासरच्या लोकांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. याप्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.