शेतीच्या रस्त्यावर काट्या टाकल्याने झाला वाद; कुऱ्हाडीने हल्ला करून शेतकऱ्याची हत्या (फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)
यवतमाळ : शेतातून ये-जा करण्याच्या मार्गावर काट्या टाकल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद घालून एका शेतकऱ्यावर त्याच्या शेतशेजाऱ्यानेच कुऱ्हाडीने हल्ला चढविला. या हल्ल्यात त्याच्या पाठीला आणि छातीला गंभीर दुखापत होऊन तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही गंभीर घटना शनिवारी (दि.14) सकाळी घाटंजी तालुक्यातील आकपुरी शिवारात घडली.
सुधाकर महादेव बोटरे (वय 45, रा. धानोरा) असे मृताचे नाव असून, रमेश श्यामराव कुळसंगे (वय 40, रा. गणेशपूर) असे मारेकऱ्याचे नाव आहे. शनिवारी सकाळी सुधाकर नेहमीप्रमाणे शेतात जाण्यासाठी घराबाहेर पडले. शेतात पोहोचल्यानंतर त्याने शेतातील काट्या तोडून त्या रस्त्यावर फेकल्या. ही बाब आरोपी रमेशच्या लक्षात येताच त्याने त्याच्याशी रस्त्यावर काट्या टाकल्याच्या कारणावरून वाद घातला. अशातच वाद विकोपाला जाऊन आरोपी रमेशने सुधाकरवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात तो जमिनीवर कोसळला.
दरम्यान, ही बाब अन्य शेजारील शेतकरी आणि शेतात राबणाऱ्या मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी तेथे धाव घेतली. तसेच सुधाकरची त्याच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्यांनी आणि कुटुंबीयांनी सुधारकला तत्काळ उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न देताच त्याचा तेथे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलिसांनी आरोपी रमेशला ताब्यात घेतले.
फक्त 50 रुपयांसाठी एकाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, उसनवारीने घेतलेले 50 रुपये परत न केल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद घालून एकाला तिघांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जमिनीवर आपटून त्याच्या पोटावर व डोक्यावर प्रहार केला. त्यामध्ये संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 13) दुपारच्या सुमारास तालुक्यातील कोर्टा शिवारात घडली.