पुण्यातील ढोल ताशा पथक (फोटो- instagram)
पुणे/ सुनयना सोनवणे: गणपती विसर्जनाचा आत्मा असणारे ढोल ताशा पथक नेहमीच आपल्या ठेक्याने मिरवणूक गाजवत असतात. याही वर्षी ही पथके आपल्या सादरीकरणाने मिरवणूक गाजवण्यासाठी सज्ज झाली आहेत. पारंपरिक, सामाजिक, सांस्कृतिक विषयांना घेऊन हे वादन असणार आहे. तसेच यंदा नवीन काय ऐकायला मिळणार याचीही उत्सुकता मिरवणुकीच्या आधीच सर्वांना लागली आहे.
एकीकडे डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आपण बघतो. तर दुसरीकडे ढोलाच्या ठेक्यावर आणि ताशाच्या तर्रीवर मिरवणूक डोलावणारी तरुणाई मोठ्या प्रमाणात दरवर्षी सहभागी होताना दिसते. दिवसेंदिवस तरुणाईचा ढोल पथकात सहभागी होण्याकडे कल वाढला आहे. महिलांचाही उत्साही सहभाग पथकात पाहायला मिळतो.
गणपती विसर्जनाची मिरवणूक आणि ढोल – ताशे यांचे जुने नाते आहे. त्यामुळे आता पथकांची संख्याही वाढली आहे. शहर आणि उपनगर मिळून एकूण दोनशे पथक सक्रिय आहेत. ही पथके पारंपारिक तालासोबतच दरवर्षी नवीन वेगळा ताल बसवून गर्दी खेचून आणण्यात यशस्वी झाली आहेत. मिरवणुकी नंतरही त्यांचे वादन गाजले आहे. पारंपारिक ढोल, ताशे, संबळ, दिमटी, शंख, ध्वज असे अनेक वाद्य साहित्यांसोबत नवनवीन प्रयोग पथके करत असतात. त्यामुळे यावर्षी नवीन काय ऐकायला मिळेल याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.
नेहमीच्या तालाबरोबरच नवीन ताल आम्ही बसवले आहेत. रामजी की सवारी, बांगडा असे नवीन ताल आम्ही यावर्षी मिरवणुकीत वाजवणार आहोत. त्याचबरोबर पारंपारिक ढोलाऐवजी पर राज्यातले ढोल आम्ही प्रथमच वापरत आहोत. यावर्षीचा पोशाखही आकर्षक असणार आहे, अशी माहिती समर्थ ढोलपथकाचे संजय सातपुते यांनी दिली.
अगदी कमी वेळात आपला नावलौकिक वाढवलेले अभेद्य पथकही नेहमीच सक्रिय असते. पारंपरिक एक ते सहा या तालासोबतच ‘हे गणराया, ढोलीबाजा, महाकाल, भजनी ठेका, नवीन आणि जुना गावठी या तालांमधील नवीन व्हेरिएशन या वर्षी ऐकायला मिळेल. बाबू गेनू मंडळासाठी विसर्जन मिरवणूक वाजवणार असल्यामुळे त्या मंडळाच्या यावर्षीच्या देखाव्याला साजेसा असा ‘केरळी ठेका’ आम्ही बसवला आहे. पथकात मुलींचा सहभाग जास्त असल्यामुळे मुलींचा पोशाख, त्यांची केशरचना, नथ, बुगडी असा आकर्षक पेहराव असणार आहे, अशी माहिती अभेद्य पथकाचे सौरभ गुजर यांनी दिली.
ढोल, ताशा, ध्वज सोबतच संबळ मधील तालांचे नवीन प्रकार आम्ही या वर्षी सादर करणार आहोत, अशी माहिती कलावंत पथकाचे ताशावादक सौरभ गोखले यांनी दिली.
दोनशे ते अडीचशे वर्षांपासून पुरोगामी महाराष्ट्राला आणि गावभागाला लाभलेल्या परंपरा, यात्रा, जत्रा, आदींची अनेक प्रात्यक्षिके आम्ही यावर्षी ढोल ताशा वादनासोबतच करणार आहोत. ध्वज, झांज, ढोल, ताशे यांच्या वादनासह पथकाची आकर्षक वेशभूषा असणार आहे, असे नूतन मराठी विद्यालय पथकाचे यज्ञेश मुंडलिक यांनी सांगितले.
यावर्षी नवीन काय ऐकायला मिळणार?
कच्ची बाजा,
जोगण,
देवीचा ठेका,
कावड,
धमार,
रावडी राठोड,
भजनी ठेका,
इंद्रजीमी जम्बपर ,
तिहाई,
लावणी