संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज आत्महत्येच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ठेकेदाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे.
चंदर पिराजी माेहिते (वय ५६, रा. विनय सागर आर्केड, त्रिमूर्ती चौकाजवळ) असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत मोहिते यांची पत्नी शकुंतला (वय ५६) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बांधकाम व्यावसायिक संतोष चोरगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चंदर हे रंगकाम करतात. वेगवेगळ्या गृहप्रकल्पाच्या रंगाचे काम घेतात. बांधकाम व्यावसायिक चोरगे हे चंदर यांच्या ओळखीचे होते. चोरगेने त्यांना तीन गृहप्रकल्पात रंगकाम करण्याचे काम दिले होते. कामाच्या बदल्यात चोरगे यांनी चंदर यांना एक फ्लॅट व साडेदहा लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. चंदरने हातऊसने पैसे घेऊन तीनही गृहप्रकल्पाचे काम पूर्ण केले होते. व्यवहारात ठरल्यानुसार चोरगे यांनी त्यांना पैसे, तसेच प्लॅट देण्याचे मान्य केले होते. चंदर यांनी कामाचे पैसे मागितले. त्यावेळी मात्र चोरगेने चंदर यांना जातीवाचक शिवीगाळ केली. शिवीगाळ तसेच फसवणूक केल्याने त्यांनी ९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री कात्रज घाटातील अन्विषा लॉजमागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, असे मोहिते यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक आवारे करत आहेत.
विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
पिंपरी-चिंचवड अन् पुणेकर वैष्णवी आत्महत्याप्रकरण विसरलेले नसतानाच पुण्यात एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला अन् त्यांच्या पैशांच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाह होऊन वर्ष पुर्ण होत असतानाच सासरच्यांकडून कंपनीसाठी २० लाख रुपये आणण्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. त्यामुळे तिने सतत होणाऱ्या छळाला कंटाळून शेवटी गळफास लावून आत्महत्या केली. स्नेहा विशाल झेंडगे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय ५५, रा. कर्देहळी, जि. सोलापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, ननंद तेजश्री थिटे आणि इतर दोघे अशांवर गुन्हा नोंदविला आहे.