संग्रहित फोटो
इंदापूर : पैशासाठी तगादा लावून, धमकी व मारहाण केल्यामुळे तरुणाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील आवारेवस्ती (बावडा) येथील सहा जणांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ जून रोजी रात्री घडली असून, आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव सागर माणिक जाधव (वय ३१, रा. आवारेवस्ती, बावडा) असे आहे. सागरच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ सचिन माणिक जाधव यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
मारहाण आणि धमकीचा प्रकार
सागर जाधव इंदापूर येथे ज्ञानदीप पॅरामेडिकल नावाची संस्था चालवत होता. काही महिन्यांपूर्वी त्याने अक्षय पोपट शिंदे या युवकाला संस्थेच्या फर्निचरचं काम दिलं होतं. एकूण १.१५ लाखांचे बिल झाले होते, त्यातील ५० हजार अदा करून उर्वरित रक्कम शिल्लक होती. २३ जून रोजी शिंदे व इतर चार अनोळखी युवकांनी सागरकडे तगादा लावून, त्याच्या गाडीची चावी हिसकावून घेतली. त्यानंतर इंदापूर–अकलूज रस्त्यावर सागर व त्याचा भाऊ सचिन यांना अडवून मारहाण करण्यात आली. घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर संध्याकाळी शिंदे व तीन अनोळखी इसम पुन्हा स्विफ्ट कारने सचिन जाधव यांच्या घरी आले. “इंदापूरला चल, तुला मारायचं आहे,” अशी धमकी देत शिवीगाळ केली व तेथून निघून गेले. या घटनेने सागर मानसिकदृष्ट्या खचला होता. तो कुणाशी फारसे बोलत नव्हता.
सागरने संपवले जीवन
मंगळवारी (२५ जून) रात्री सागरने जेवण करून झोप घेतली. गुरुवारी (२६ जून) सकाळी सहा वाजता तो घराच्या स्वयंपाक घरात ओढणीने गळफास घेऊन मृतावस्थेत आढळून आला. या प्रकरणी अक्षय पोपट शिंदे, विजय सतीश आवारे (दोघे रा. आवारेवस्ती, बावडा) आणि चार अनोळखी इसमांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.