संग्रहित फोटो
पिंपरी : मम्मी, मला मरायचं आहे…, मी विष प्यायलो आहे… माझ्या बहिणींची काळजी घ्या… अशा हृदयद्रावक शब्दांत भावनांना वाट मोकळी करून एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई-वडिलांना ऑडिओ-व्हिडिओ क्लिप पाठवून तरुणाने विष प्राशन केले आहे. शनिवारी (दि. 21) मावळ तालुक्यातील घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी ही घटना घडली आहे.
संजयकुमार राजपूत (18, रा. काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयकुमार हा देहूरोडजवळील विकासनगर भागात बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. 17 जून रोजी तो कामावर गेला, त्यानंतर घरी परतलाच नाही. त्याच्या बेपत्ताबाबतची तक्रार देहूरोड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. अखेर शनिवारी (दि. 21) त्याचा मृतदेह घोरावडेश्वर डोंगराजवळ आढळला. मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटलीही सापडली आहे. अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.
आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ आईला पाठविले
संजयकुमारने आत्महत्या करण्यापूर्वी दोन व्हिडीओ आणि एक ऑडिओ क्लिप आपल्या आईला पाठवली होती. या क्लिपमध्ये त्याने बहिणींची जबाबदारी घेण्याची आई-वडिलांना विनंती केली आहे. माझ्या आईवडिलांना एवढंच सांगायचे आहे की, माझ्या बहिणींना कुणी त्रास देऊ नका… मला काही नकोय… फक्त माझ्या बहिणींची चिंता आहे. दोन्ही बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत. त्यांचे चांगले पालनपोषण व्हायला हवे. ही क्लिप ऐकून संजयकुमारच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ऑनलाइन मागवले विष
संजयकुमार याने आत्महत्या करायचे ठरवले. त्यासाठी त्याने ऑनलाइन विष मागवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.