फोटो सौजन्य - Social Media
मोखाडा/ दीपक मधुकर गायकवाड: पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पिंपळाचापाडा येथे रविवार, २७ ऑक्टोबर रोजी एका ७ वर्षीय बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत मोखाडा पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणात एक संशयिताला ताब्यात घेतले आहे. भिवंडी येथील प्रथमवर्ग न्यायालयात या संशयिताला हजर करण्यात आले असल्याची माहिती मोखाडा पोलिसांनी दिली आहे.
हे देखील वाचा : Baramati Assembly Constituency : पवारांच्या लढाईत अभिजीत बिचुकलेंची उडी; बारामतीतून लढणार निवडणूक
सदर घटना मोखाडा तालुक्याच्या नजीक असलेल्या पिंपळाचापाडा येथे घडली. घटना अशी कि ७ वर्षीय बालिका शेजारी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेली होती. मात्र, ती रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. तिच्या शोधासाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थ एकवटले. बालिकेच्या कुटुंबीयांनी आणि गावातील ग्रामस्थांनी शोध सुरू केला. तिचा शोध घेत असताना ती मुस्लीम बांधवांच्या दफनभूमीजवळ संशयास्पद स्थितीत आढळून आली. लगेचच तिची स्थिती पाहून तिला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेने पालघर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.
या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली असून, स्थानिक लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मोखाडा पोलिसांनी या घटनेची पारदर्शक चौकशी सुरू केली आहे. बालिकेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी तिचे शव नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतरच बालिकेच्या मृत्यूचे वास्तविक कारण स्पष्ट होईल. अद्याप शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांच्या हाती आला नाही आहे.
सदर तपास पालघर पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे. सदर घटनेच्या तपासासाठी पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले तपास करीत आहेत.
तपास अधिक गहन करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील साक्षीदारांचे निवेदन नोंदवले आहे आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. मोखाडा पोलिसांनी या संदर्भात प्रलंबित तपासाची माहिती लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगितले आहे. या प्रकरणात जनतेचा सहकार्य मिळवण्यासाठी पोलिसांनी अपील केली आहे, जेणेकरून सत्य परिस्थिती उजेडात येईल आणि दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या भावना विचारात घेऊन पोलिसांनी चौकशीत पारदर्शकता राखण्याचे आश्वासन दिले आहे.