फोटो सौजन्य: iStock
मोखाडा/ दीपक मधुकर गायकवाड: सध्या महाराष्ट्रात गुन्हेगारी सातत्याने वाढताना दिसत आहे. यामुळे पोलिसांसमोर ही वाढती गुन्हेगारी थांबवण्याचे मोठे आव्हान आहे. नुकतीच एक घटना पालघरमधील मोखाड्या तालुक्यात घडली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर निघालेल्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना सविस्तर जाणून घेऊया.
मोखाडा नजिक पिंपळाचापाडा येथे रविवारी रात्री शेजारी वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका 7 वर्षीय बालिकेला आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेननंतर मोखाडा पोलिस एकूणच घटनाक्रमाचा मागोवा घेत आहेत.
हे देखील वाचा: टाटा मीठाच्या नावाने बनावट मिठाची विक्री; किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल
शेजारी वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असल्याचे सांगून पिंपळाचापाडा येथील 7 वर्षीय बालिका घरातून गेली ती उशीरा पर्यंत घरी आली नाही. त्यामूळे घरातील लोकांनी तीची शोधाशोध सुरू केली असता जवळच असलेल्या मुस्लिम बांधवांच्या दफनभुमी जवळ सदर बालिका पडलेली आढळून आली. तीला लगोलग मोखाडा ग्रामीण रुग्णालयात हलविले असता तिला मृत घोषित करण्यात आले आहे. मात्र मोखाडा पोलिसांनी सदर बालिकेचे शव विच्छेदन करून अहवाल प्राप्त करून घेण्यासाठी नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवले असल्याचे समजते. शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वस्तूस्थिती समोर येणार आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलिस उपअधिक्षक गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले व त्यांची संपूर्ण टिम करीत आहे.
सदर बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा संशय असून ही घटना रविवारी २७ तारखेला मोखाड्यात घडली आहे.या घटनेने मोखाडा तालुका हादरला असून पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पिंपळाचापाडा सह शेजारील गाव पाड्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या मुली तालुक्याच्या शाळेत कशा पाठवायच्या,त्यांच्या सुरक्षिततेचे काय अशी भिती पालकांमधून व्यक्त केली जात आहे.
या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर पकडावे आणि त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता गावामध्ये जोर धरू लागली आहे.