संग्रहित फोटो
पुणे : एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पर्वती पायथा परिसरात घडली आहे. याप्रकरणी एसटी बसचालकाववर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विजय गोपाळ गेजगे (रा. पर्वती पायथा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गेजगे यांचा मित्र आशिष मारुती भालेराव (वय ३४, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, एसटी बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार गेजगे पर्वती पायथा परिसरातून मंगळवारी (४ मार्च) रात्री पावणेदहाच्या सुमारास निघाले होते. पर्वती पायथा परिसरात त्यांनी दुचाकी थांबविली. रस्त्याच्या कडेला ते दुचाकी लावत होते. दुचाकी लावताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले. त्या वेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव एसटी बसचे चाक त्यांच्या दोन्ही पायांवरुन गेले. गंभीर जखमी झालेल्या गेजगे यांना तातडीने नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसंनी घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता एसटी बसचालक पसार झाला. उपचारादरम्यान गेजगे यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक राहुल नामदे अधिक तपास करत आहेत.
वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू
हडपसर-सासवड रस्त्यावर वाहनाच्या धडकेत सायकलस्वार ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रवींद्र सिद्धप्पा माळगी (वय ६०, रा. वडकी) असे मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. याबाबत माळगी यांचा पुतण्या रोहित विजय माळगी (वय ३२, रा. वाघोली, नगर रस्ता) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र माळगी हे ३ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सासवड रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने माळगी यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या माळगी यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक कोमल जाधव अधिक तपास करत आहेत.
पाषाण भागात पादचाऱ्याचा मृत्यू
गेल्या काही दिवसाखाली भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आशिषकुमार सर्वानंद उपाध्याय (वय २६, रा. पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत आशिषकुमार यांचा भाऊ अभिषेकुमार (वय ३१) यांनी चतु:शृंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास आशिषकुमार पाषाण रस्त्यावरून निघाले होते. त्यावेळी ‘डीआरडीओ’ संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या आशिषकुमार यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक श्यामल पाटील तपास करत आहेत.