पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले (संग्रहित फोटो)
पुणे : राज्यात लाच घेणाऱ्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई होताना दिसत आहे. लाच घेतल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. अशातचं आता फुरसुंगीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सातबारा उताऱ्यावरील नोंदीसाठी तलाठ्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे. फुरसुंगीतील तलाठी कार्यालयाच्या आवारात ही कारवाई केली. याप्रकरणी ठकसेन उर्फ तुषार मारुती गलांडे (वय ४२, रा. नारायणनगर, फुरसुंगी, हडपसर) याच्यावर हडपसर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वाये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.
सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात एकाने जमीन खरेदी केली होती. तक्रारदारांना मिळकती संदर्भातील फेरफार आणि सातबारा नोंदणीचे काम शासकीय पत्राद्वारे तक्रारदारांना देण्यात आले आहेत. या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तक्रारदार पाठपुरावा करत होते. तक्रारदार फुरसुंगी येथील तलाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी तलाठी कार्यालयात वावर असलेला दलाल आरोपी ठकसेन गलांडे याने तलाठ्याकडून सातबारा उताऱ्यावर नोंदीचे काम करुन देतो. त्यसाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील, असे तक्रारदाराला सांगितले.
हे सुद्धा वाचा : येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
तक्रारदाराने तडजोडीत पाच हजार रुपये लाच देण्याचे मान्य करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. बुधवारी दुपारी तलाठी कार्यालयात सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून तलाठ्यासाठी लाच घेणाऱ्या गलांडेला ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल भोसले अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : संतोष देशमुख हत्येप्रकरणावरुन खासदार सोनवणेंचा गंभीर आरोप; म्हणाले, हे सगळे आरोपी…
चारशे रुपयांची लाच घेणे अंगलट
राज्यात लाच घेतल्याचे अनेक प्रकरण उघडकीस आले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कोणतीही त्रुटी काढल्याशिवाय वाहनांचे हस्तांतरण (ट्रान्सफर ऑफ ओनरशिप) करून देण्यासाठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने 400 रुपयांची लाच मागितली. दलालाच्या माध्यमातून पैसे घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या पथकाने दोघांनाही पकडले. या कारवाईने ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. अश्फाक मेहमूद अहमद (वय 57) आणि मिर्झा असराग अकरम बेग (वय 30) अशी आरोपींची नावे आहेत.