संग्रहित फोटो
पुणे : कात्रज तसेच आंबेगाव भागात दहशत माजविणाऱ्या येनपूरे टोळीचा म्होरक्या पप्पू येनपूरे याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बारामतीमधून अटक केली आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) येनपूरे टोळीविरुद्ध कारवाई केली होती. मोक्का कारवाईनंतर तो गेले दोन वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता.
प्रवीण उर्फ पप्पू अनंता येनपूरे (वय ३०, रा. सच्चाईमातानगर, कात्रज) असे अटक केलेल्या म्होरक्याचे नाव आहे. येनपूरे याच्यासह साथीदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या निरीक्षक संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
दोन वर्षापुर्वी भारती विद्यापीठ पोलिसांनी येनपूरेसह साथीदारांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली होती. कारवाईनंतर येनपूरे पसार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. येनपूरे मोबाइल वापरत नव्हता, तो वास्तव्याचे ठिकाण देखील सातत्याने बदलायचा. त्यामुळे तांत्रिक तपासात त्याच्याविषयी फारशी मिळत नव्हती.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मंगेश पवार, महेश बारावकर, सचिन गाडे, अभिनय चौधरी त्याचा माग काढत होते. तेव्हा तपासात तो बारामतीतील नीरा वागस परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती या कर्मचाऱ्यांना मिळाली. या माहितीची खातरजमा केली. नंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून येनपूरेला नीरा वागस परिसरातून ताब्यात घेतले.
हे सुद्धा वाचा : दुकान फोडून साहित्य चोरणारा अटकेत; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त
दगडाने ठेचून मुलाचा खून
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.