झाडावर कार आदळून चालक ठार (संग्रहित फोटो)
नाशिक : भरधाव वेगात वाहने जात असल्याने अनेक रस्ते अपघात होताना दिसत आहे. असे असताना नाशिकच्या पंचवटीत अपघात झाला. तपोवनातून लक्ष्मी नारायण मंदिर मार्गे पंचवटी अमरधामकडे जाणाऱ्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामध्ये होंडा सिटी कार एका झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
देवळाली कॅम्प येथील 21 वर्षीय चालक सुरज संजय यादव याचा मृत्यू झाला. तर कारमधील तिघे जखमी झाले. देवळाली कॅम्प येथील सुरज यादव (वय २२), राजेश हरी ठाकूर (वय २१), प्रियांशू मोही विश्वकर्मा (वय २३), सतीश संतोष यादव (वय २२) असे चौघेजण मध्यरात्री काळ्या रंगाच्या होंडा सिटी कारमधून (एमएच ०१ वीयू ३११२) तपोवन बाजूने पंचवटी अमरधाम रस्त्याने जात असताना भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले.
हेदेखील वाचा : मूल-चिचाळा रस्त्यावर भीषण अपघात; कार-दुचाकीमध्ये जोरदार धडक, दोघांचा मृत्यू
अनियंत्रित कार महानगरपालिकेच्या मलजल उपसा केंद्रासमोरच्या रस्त्याच्या पलीकडे झाडावर आढळली. अपघात इतका भीषण होता की, त्यात कारचा पुढचा व मागील भाग पूर्णपणे दबला गेल्याने चक्काचूर झाला होता. अपघातात प्रियांशू विश्वकर्मा, राजेश ठाकूर तसेच सतीश यादव हे जखमी झाले असून, विश्वकर्मा व ठाकूर हे किरकोळ जखमी झाले तर यादवच्या पायाला गंभीर मार लागला असून, या जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शंभरच्या स्पीडने कार असल्याची शक्यता
अपघातग्रस्त कार ही शंभर ते सव्वाशे प्रति तास वेगाने असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अपघाताची घटना घडल्यानंतर त्याच परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अमोल पाटील, अनिल सोर, संदीप बाविस्कर या कर्मचाऱ्यांनी कारचा दरवाजा तोडून अडकलेल्यांना बाहेर काढत रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलविले.
चंद्रपूरच्या थेरगावात भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील थेरगाव येथे भीषण अपघात झाला. कार आणि दुचाकी या वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. थेरगाव येथे जात असलेल्या दुचाकीस्वारांना ताडाळाकडून मूलकडे येत असलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिली. यात दोन जण जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि. ११) दुपारी घडली.






