संग्रहित फोटो
पिंपरी : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या बातम्या उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माझ्याबाबत इतरांना वाईट का सांगतोस, असे म्हणत एका तरुणाने दाम्पत्याला सिमेंट ब्लॉकने मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना साईनाथनगर, निगडी येथे बुधवारी (दि. १६) दुपारी घडली आहे. गणेश चंद्रकांत पवळे (४४, रा. साइनाथ नगर, निगडी) यांनी गुरुवारी (दि. १७) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकाश सिताराम गायकवाड (२३, रा. साईनाथनगर, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी आरोपी गायकवाड हा फिर्यादी पवळे यांच्या घरी आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करीत घराबाहेर बोलविले आणि म्हणाला की, तू माझ्याबाबत नागेश चिखले याला वाईट का सांगितले, अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादी यांनी मी कोणालाही तुझ्याबाबत वाईट सांगितले नाही. तुझा काहीतरी गैरसमज झाला असल्याचे म्हणाले. यामुळे चिडलेल्या आरोपी गायकवाड याने सिमेंट ब्लॉक फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले. फिर्यादी यांना वाचविण्यासाठी त्यांची पत्नी आली असता आरोपीने त्यांच्या पायावर सिमेंट ब्लॉक मारून जखमी केले. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.