संग्रहित फोटो
पुणे : प्रेमसंबंध तोडल्यानंतर चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने पिस्तूल लॉक झाले आणि गोळी झाडलीच न गेल्याने प्रेयसी बचावली होती. याप्रकरणात पसार झालेल्या प्रियकराला गुन्हे शाखेच्या युनीट चारने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काडतुसे जप्त केली आहेत.
खडकी बाजार परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. गौरव महेश नायडू (वय २५, रा. श्रीरंग रेसीडन्सी, गायकवाडनगर, पुनावळे, पिंपरी-चिंचवड) असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अमर कदम, उपनिरीक्षक वैभव मगदूम व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
नायडू आणि तक्रारदार तरुणीचे गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, नायडूच्या वर्तनामुळे त्याच्याशी बोलणे बंद केले होते. तसेच, प्रेमसंबंध तोडले होते. त्याला झिडकारल्याने नायडू चिडला होता. तरुणी एमबीए अभ्यासक्रम करत असून, ती बाणेर भागातील एका कंपनीत नोकरी देखील करते. दोन दिवसांपुर्वी (दि.२९ ऑगस्ट) तरुणी कंपनीत आली होती. त्यावेळी नायडू याने तिला कंपनीच्या आवारात अडवले. तो आधीच कंपनीत आलेला होता. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने डिलिव्हरी बॉयसारखा गणवेश घातला होता. नायडूने तरुणीवर पिस्तूल रोखले.
तरुणीवर पिस्तुलातून तीन वेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुलातून गोळी सुटली नाही. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर नायडू दुचाकीवरुन पसार झाला होता. नंतर बाणेर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्याचा शोध सुरू होता. तेव्हा गोळीबार करणारा गौरव खडकी बाजार परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली.