अहिल्यानगर पोलिसांचा एलसीबी संशयाच्या भोवऱ्यात; ड्रग्ज तस्करीप्रकरण; सहभाग कोणा-कोणाचा तपास सुरू
पुणे : शिरूर शहरातून उघडकीस आलेल्या ड्रग्ज तस्करीप्रकरणात अहिल्यानगर पोलिस दलातील पोलिस हवालदाराचा सहभाग समोर आल्यानंतर आता अधिक तपासात अहिल्यानगर पोलिसांचा एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) विभागही संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, यादृष्टीने तपास पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केला आहे. कारण, श्रीरामपुर पोलिसांनी २०२५ मध्ये एका कारवाईत अल्प्राझोलम हा अमली पदार्थ पकडला होता. तो अहिल्यानगर पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून बाहेर काढून विक्री करण्यात आला आहे. त्यामुळे त्या पोलिस हवालदाराला आणखी कोणाची मदत होती का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पोलिस हवालदार शामसुंदर विश्र्वनाथ गुजर (वय ३९, रा. नेप्ती) असे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या कारवाईने पुण्यासह अहिल्यानगर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : Ahilyangar News: कोणाच्या घरात होते ड्रग्ज? सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न
शामसुंदर गुजर याचे आणि यातील आरोपी ऋषीकेश चित्तर याचे अनेक वर्षांपासून संबंध आहेत. डिसेंबर महिन्यात त्याने मुद्देमाल कक्षातून हा अमली पदार्थ काढून तो चित्तर याला दिला. त्याने तो शिंदे व गायकवाड यांच्या मार्फत शादाब शेख याच्यापर्यंत विक्रीसाठी पोहच केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी पोलिस हवालदार गुजर याच्यासह ५ जणांना अटक केली आहे.
शादाब रियाज शेख, ज्ञानदेव उर्फ माऊली बाळू शिंदे, ऋषीकेश प्रकाश चित्तर, महेश दादाभाऊ गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनी अहिल्यानगर पोलिसांना याबाबत पत्रव्यवहार केला असून, गुजर याने यापुर्वीही अशाच प्रकारे आणखी काही अमली पदार्थ मुद्देमाल कक्षातून गैरप्रकारे बाहेर काढले आहेत का याची चौकशी करण्यास सांगितले आहे.
गुजर गुन्हे शाखेत हवालदार पदावर कार्यरत
गुजर हा अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत हवालदार पदावर कार्यरत होता. मुद्देमाल कारकून म्हणून काम पाहत असल्याने त्याला कोणत्या कारवाईत किती अमली पदार्थ जप्त केले याची माहिती होती. विशेष म्हणजे, गुजर याने मुद्देमाल कक्षातून अल्प्राझोलम हा अमली पदार्थ बाहेर काढताना आपली चोरी पकडू नये म्हणून त्या ठिकाणी अमली पदार्थासारखा दिसणारा दुसरा तत्सम पदार्थ ठेवल्याचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोण आहे पोलिस हवालदार गुजर?
गुजर हा २००८ मध्ये अहिल्यानगर पोलिस दलात भरती झाला. प्रशिक्षण कालावधीनंतर पहिली नेमणूक पारनेर पोलिस ठाण्यात झाली. तेथे मुद्देमाल कारकूनची जबाबदारी. नंतर पारनेर पोलिस ठाण्यातून बदली झाल्याने तोफखाना पोलिस ठाण्यात नेमणूक. तेथे काही दिवस काम केल्यानंतर त्याला अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती मिळाली. तेथे त्याच्यावर परत मुद्देमाल कारकूनची जबाबदारी.
अल्प्राझोलम नावाचा अमली पदार्थ जप्त
त्यांच्याकडून १० किलो ७०७ ग्रॅम वजनाचा अल्प्राझोलम नावाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे २५ ते ३० कोटी असल्याचे सांगण्यात आले.






