संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात लुटमार सत्र कायम असून, हनुमान टेकडीवर मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गेल्या काही दिवसांतील हनुमान टेकडीवर लुटमारीची ही तिसरी घटना असून, या तरुणीकडील १ लाख रुपयांची सोनसाखळी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात १७ वर्षीय मुलीने तक्रार दिली आहे. दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार तरुणी एका महाविद्यालयात आहे. याप्रकरणी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (४ जानेवारी) दुपारी दोनच्या सुमारास तरुणी आणि तिचा मित्र सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी तरुणी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राला धमकावून शिवीगाळ केली. त्यांना कोयत्याचा धाक दाखविला. मारहाण करुन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील १ लाख रुपयांची सोनसाखळी चोरून नेली. घाबरलेली तरुणी आणि तिचा मित्र तेथून घरी गेले. त्यानंतर तिने सोमवारी (६ जानेवारी) डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.
हनुमान टेकडी परिसरात गेल्या दोन महिन्यात टेकडीवर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणांना लुटल्याच्या ३ घटना घडल्या आहेत. बाणेर-पाषाण रस्त्यावरील टेकडीवर फिरायला आलेल्यांना देखील लुटण्यात आल्याची घटना घडली होती. चतु:शृंगी पोलिसांनी चोरट्यांना अटक केली होती.
कडाक्याच्या थंडीत डोंगर तसेच टेकड्यांवर पहाटे व सायंकाळी नागरिक नियमित फिरायला जातात. हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, पाषाण-बाणेर रस्त्यावरील टेकडी, तळजाई टेकडी आहेत. टेकड्यांवरील लुटमारीच्या घटना घडल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिला लुटले देखील होते. याप्रकरणाने शहरातील टेकड्यांवरील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता. मात्र, त्यानंतर हा विषय पुन्हा थंड पडला आहे.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोघांना पकडले
लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ
राज्यात लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून घटना उघडकीस येत आहेत. यामुळे पोलीसही हैराण झाले आहेत. अशातचं आता सिगारेट मागण्याच्या बहाण्याने जवळ जावून तिघांनी दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना मारहाण करून लुटल्याची घटना कात्रज-देहूरोड बायपासवर नऱ्हे परिसरात घडली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.