संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संक्रातीतील पतंगबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे नागरिक तसेच पक्ष्यांना गंभीर दुखापत होण्याच्या घटना घडल्या आहेत. नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असताना छुप्या पद्धतीने मांजा विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने पकडले आहे. त्यांच्याकडून नायलॉन मांजाची रिळे जप्त करण्यात आली आहेत. बिबवेवाडी आणि धानोरी भागात ही कारवाई करण्यात आली आहे.
बिबवेवाडी भागातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर परिसरात एक जण नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलीस शिपाई सुमीत ताकपेरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून नायलाॅन मांजाची ५० रिळे जप्त केली. जप्त केलेल्या मांजाची किंमत दहा हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आदेशाचा भंग करणे, तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये पृथ्वीराज राजेश म्हस्के (वय २३, रा. सिद्धार्थनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. सुमीत ताकपेरे यांनी याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार आंग्रे तपास करत आहेत.
विश्रांतवाडी भागातील मुंजाबा वस्तीत नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून नायलाॅन मांजाचे रिळ जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी नसीम अल्ताफ शेख (वय ५०, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी, विश्रांतवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस कर्मचारी नागेश कुंवर यांनी याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार केंद्रे तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : मी शेवटचं सांगतो, शहर सोडून जा, नाहीतर…; पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दम
दुचाकीस्वारांनो, नायलॉन मांजापासून सावधान
पतंगबाजीसाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा अतिशय घातक ठरत असून, दरवर्षी नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होतात. कुणाचा हात कापला जातो तर कुणाचा गळा चिरून गंभीर जखम होते. रस्त्यांवर कुठेही नायलॉन मांजा अडकलेला असू शकतो. त्यामुळे नागरिकांनी दुचाकी चालविताना दक्षता घेणे गरजेचे आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची सर्रासपणे विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक मुले पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करत असून, मांजा घासल्याने दुचाकीस्वाराचा गळा चिरून जखमी झाल्याच्या अनेक घटना स्थानिक किसननगर भागात नुकत्याच घडल्या आहेत. यातील जखमीवर खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरवर्षी नायलॉन मांजामुळे दुर्घटना घडत आहेत.