संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. चोरटे वेगवेगळे आमिषे दाखवून नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सायबर चोरट्यांनी एका आयटी इंजिनिअर दाम्पत्याला अवघ्या सात दिवसात सव्वा कोटींना गंडा घातला आहे. त्यांना टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधत पार्ट टाईम जॉब व ट्रेडिंग करण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी फसवले आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात ४० वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार टेलिग्राम आयडी धारक, ग्रुपचे प्रमुख तसेच बँक खातेधारक यांच्यावर आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांचे पती हे आयटी इंजिनिअर आहेत. ते हडपसरमधील मगरपट्टा सिटीत राहण्यास आहेत. दरम्यान त्यांना २३ जुलै रोजी शंभर टक्के रिअल रिक्रुटमेंट टीम १९०४ या नावाच्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले होते. याबाबत त्यांना विचारणाही करण्यात आली नाही. परस्पर त्यांना ग्रुपमध्ये सहभागी केले. नंतर त्यांना या कंपनीचा एजंट असल्याचे भासवून वैयक्तिक आणि ग्रुपमध्ये बोलण्यास सुरुवात केली. त्यांच्याशी सतत संपर्क ठेवत त्यांना पार्ट टाईम जॉब आणि ट्रेडिंगची माहिती दिली. त्यात पैसे गुंतवल्यास चांगला नफा होईल असे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन केला.
सायबर चोरट्यानी तक्रारदारांला वेगवेगळ्या बँक खात्यावर वेळोवेळी पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यांनी केवळ २३ ते ३१ जुलै २०२५ या सात ते आठ दिवसांच्या कालावधीत तबल १ कोटी २७ लाख ७० हजार रुपये खात्यावर टाकले. मात्र त्यानंतरही त्यांना पैसे भरण्यास सांगितले जात होते. तर भरलेल्या रकमेवर परतावा दिला जात नव्हता. त्यावेळी त्यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी पैसे परत मागितले. मात्र नंतर चोरट्यानी संपर्क बंद केला. नंतर त्यांनी सायबर पोलिसाकडे तक्रार दिली. त्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोनाली शिंदे या करत आहेत.
हे सुद्धा वाचा : तोतया आयकर अधिकारी घरात शिरले, कागदपत्रे तपासण्याचे ढोंग केले अन्…