संग्रहित फोटो
पुणे/ अक्षय फाटक : पुणेकरांची “जीवनवाहिनी” असलेली पीएमटी अन् त्याचे बस थांबे सध्या चोरट्यांचे अड्डे झाल्याचे वास्तव आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा चैन स्नॅचर टोळ्यांनी उचलखाली असून, बसमधील आणि थांब्यावरील गर्दीत महिला व ज्येष्ठांना टार्गेट करून त्यांच्याकडील मोबाईल व दागिने चोरून नेत असल्याच्या धक्कादायक घटना घडत आहेत. गेल्या ११ महिन्यांमध्ये तब्बल ६६ घटना घडल्या आहेत. त्यातील केवळ १३ घटना उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. जंगजंग पछाडून देखील पोलिसांना या घटना रोखता येत नसल्याचे दिसत आहे. तर, चोरट्यांचाही थांगपत्ता लागत नसल्याचे पाहिला मिळत आहे.
पुणे शहरात गर्दीत चोऱ्या करणाऱ्या तसेच पादचारी महिला आणि नागरिकांना लुटणाऱ्या चोरट्यांनी काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. दररोज दोन ते तीन घटना सरासरी घडत आहेत. त्यातही स्वारगेट बस स्थानक व शहरातील गर्दी असणारे पीएमपीचे थांबे हे चोरट्यांचे अड्डे झाल्याचे दिसत आहे. पीएमपी बसमध्ये चढत असताना आणि प्रवासात गर्दीत हे चोरटे महिलांच्या गळ्यातील, बॅगेतील तसेच हातातील सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरून पोबारा करत आहेत.
पीएमटी बसला सकाळी आणि सायंकाळी मोठी गर्दी असते. कार्यालये, ऑफिस तसेच शाळा व महाविद्यालये सुटल्यानंतर अनेकजन पीएमटीने प्रवास करतात. तेव्हा मोठी गर्दी असते. या गर्दीत चोरटे “मिक्स” होतात. गर्दीत धक्काबुक्की व ढकला-ढकलीचा प्रसंग होत असतो. तीच संधी साधत चोरटे हेरून दागिन्यांवर व मोबाईल डल्ला मारत असल्याचे दिसत आहे. सातत्याने त्याच परिसरात घटना होऊन देखील पोलिसांना या चोरट्यांचा माग निघत नसल्याने नेमकी पोलिसांची गस्त असते कोठे असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. विशेष करून या घटना स्वारगेट बस स्थानक तसेच विमानतळचा परिसर आणि हडपसर भागात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निरीक्षण आहे. आकडेवारीवरून देखील या घटना या भागात मोठ्या प्रमाणात घडल्याचे दिसत आहे.
हे सुद्धा वाचा : संतापजनक! डॉक्टरचाच विवाहित महिलेवर अत्याचार; उपचारासाठी रुममध्ये नेलं अन्…
पुणे शहरात पादचाऱ्यांना लक्ष करून दुचाकीस्वार चोरटे त्यांच्याकडील चैन स्नॅचिंग तसेच मोबाईल हिसकावणारे देखील घटना मोठ्या प्रमाणात घडत असून, ११ महिन्यात तब्बल १६७ घटना घडल्या असून, त्यातील ७१ घटना उघडकीस आल्या आहेत.
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.