धक्कादायक ! देवदर्शनासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; कारमध्ये ओढत नेलं अन्...
धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढताना दिसत आहे. असे असताना देवदर्शनासाठी आलेल्या 26 वर्षीय तरुणीवर वकिलाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी (दि.4) रात्री दहाच्या सुमारास गजानन मंदिर परिसरात घडली.
महेंद्र भगवान नैनाव (रा. उत्तरानगरी, पुंडलिकनगर) असे आरोपी वकिलाचे नाव असून, त्याच्या विरोधात यापूर्वी पीडित तरुणीने आठ ते नऊ तक्रारी नोंदविल्या असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. प्रकरणात २६ पीडित तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता वकिलीच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. ४ डिसेंबर रोजी रात्री पीडिता गजानन मंदिरात दर्शनासाठी गेली होती. देवदर्शन करून ती मंदिराबाहेरील चप्पल स्टँडजवळ उभी असताना महेंद्र नैनाव हा तेथे आला.
नैनाव याने अचानक तिचा डावा हात पकडून ओढत पुलाकडे नेले आणि एका दुकानामागे उभ्या केलेल्या चारचाकीत जबरदस्तीने ढकलले. दरवाजे बंद करून त्याने चाकू दाखवत स्वतःच्या हाताची नस कापेन किंवा तुझा जीव घेईन, अशी धमकी दिली. तसेच जबरदस्तीने शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न केला.
‘केस मागे घे नाहीतर…’
या झटापटीत तिच्या डाव्या हाताला मार लागल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच, ‘केस मागे घे नाहीतर जीव घेईन, तुझे आणि मंत्री संजय सिरसाठ यांचा व्हिडिओ व्हायरल करेन’ अशी धमकी दिल्याचे देखील पीडितेने फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलिस ठाण्यात गुन्हा झाला दाखल
याशिवाय, नैनाव याने नातेवाईक वकील आणि सीनियर वकील यांनी ‘आम्ही तुला काही होऊ देणार नाही, तू तिचा काटा काढ’, असे म्हटल्याचे देखील फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या पीडितेने आरोपीला खोटी थाप देऊन आपली सुटका करुन घेतली. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुंडलिकनगर पोलिसांकडून केला जात आहे.
हेदेखील वाचा : Thane Crime: कुटुंब न्यायालयाच्या आवारात कारमध्ये सामूहिक अत्याचार, केकमध्ये गुंगीचे औषध दिले… ; आरोपी युट्युब पत्रकार






