पुणे : कात्रज भागातील पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाला मारहाण करुन साडेतीन लाखांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन अल्पवयीनांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अल्पवयीनांनी केलेल्या मारहाणीत व्यवस्थापक जखमी झाला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाने तक्रार दिली होती. त्यानूसार, तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगावकर, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चैाधरी, सागर बोरगे यांनी ही कारवाई केली.
तक्रारदार तरुण पेट्रोल पंपावर व्यवस्थापक आहे. १३ जानेवारी रोजी दुपारी पेट्रोल पंपावर जमा झालेली तीन लाख ४६ हजारांची रोकड घेऊन तो बँकेत भरणा करण्यासाठी निघाला होता. त्यावेळी कात्रज-कोंढवा रस्त्यावर त्याला अडवून अल्पवयीनांनी दांडक्याने मारहाण केली. त्याच्याकडील रोकड असलेली पिशवी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. त्याने अल्पवयीनांना विरोध केला. त्यानंतर अल्पवयीन पसार झाले. जखमी अवस्थेतील व्यवस्थापकाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलीस कर्मचारी महेश बारावकर, चेतन गोरे यांनी कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील ‘या’ बड्या हुक्का पार्लरवर छापा; पोलिसांची मोठी कारवाई
कारची काच फोडून चोरी
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता विमाननगर परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी तब्बल दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली असून, या चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी नितेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शहा व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त मुंबईहून विमाननगर येथे आले होते. तेव्हा विमाननगर भागातील वाटिका सोसायटीसमोर त्यांनी रविवारी रात्री कार लावली. नंतर ते कामाच्या ठिकाणी गेले. त्यावेळी चोरट्यांनी कारची काच फोडली. कारमधील पिशवीत ठेवलेली साडेदहा लाखांची रोकड चोरुन पोबारा केला. घटना लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास उपनिरीक्षक रवींद्र ढावरे करत आहेत. हडपसर भागात दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी रोकड, दागिने चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली होती.