धक्कादायक ! कुऱ्हाडीने वार करत जन्मदात्या आई-वडिलांची निर्घृण हत्या; नंतर स्वत:ही घेतला गळफास (संग्रहित फोटो)
बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना बुलडाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली. दारूच्या आहारी गेलेल्या एका मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांच्या हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मुलगा हा आई-वडिलांचा म्हतारपणाचा आधार असतो. ज्या आई-वडिलांनी बालपणात अंगाखांद्यावर खेळवण्यासह लाडाने मुलाचे सर्वच हट्ट पुरवण्यासाठी कधी अंगावर कर्जाचा डोंगर होईल, याचा विचारसुद्धा केला नसतो. त्याच आई-वडिलांची म्हतारपणाची काठी बनण्याची वेळ आली असताना चिखली तालुक्यातील एका क्रूरकर्मा मुलाने मध्यरात्री आई-वडील गाढ झोपेत असताना निर्दयीपणे कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना बुधवारी (दि. ५) घडली. त्यानंतर स्वतः हा गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.
चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील सुभाष दिगंबर डुकरे (वय ६७), लता सुभाष डुकरे (वय ५५) या जन्मदात्या आई-वडिलांचा कुऱ्हाडीने वार करून निर्दयीपणे हत्या करणारा मुलगा आरोपी विशाल सुभाष डुकरे (वय ३२) यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा विशाल डुकरे हा दारूच्या आहारी गेलेला होता. बुधवारी रात्री आई-वडिलांशी वाद घातला होता. यातूनच रागाच्या भरात रात्री अडीचच्या सुमारास त्याने वडील सुभाष व आई लता डुकरे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढवत अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. दरम्यान, आई-वडिलांना संपविल्यानंतर घरातच स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात हलविले.
पुण्यात भर रस्त्यात तरुणाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातील गर्दी असलेल्या रस्त्यावर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. कायदा-सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेदेखील वाचा : Bajirao Road Murder : बाजीराव रस्त्यावरील खूनप्रकरणी मोठी अपडेट; सीसीटीव्हीही कॅमेराबाबत धक्कादायक माहिती समोर






